जळगाव खुर्दच्या सरपंचाकडून आरोग्यसेवेत अडथळा

0

दुर्लक्ष करणार्‍या ग्रामसेवकालाही नोटीस : प्रांताधिकार्‍यांकडून कानउघाडणी

जळगाव – जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आरोग्यसेवा देणार्‍या कर्मचार्‍यांची दिशाभूल करून आरोग्य सेवेतच अडथळा आणण्याचा प्रकार येथील सरपंचाकडुन होत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केल्यानंतर प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी स्वत: रूग्णालयास भेट देऊन सरपंच आणि संबंधित ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी करून गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय हे कोव्हीड रूग्णालय म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या रूग्णालयात कोरोना व्यतीरीक्त इतर आजारांचा उपचार घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय अधिग्रहीत केले आहे. त्यामुळे जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना आता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचार मिळत आहे. त्यासाठी या रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, नर्स, स्टाफ अहोरात्र परिश्रम घेत आहे. गोर गरीबांना मिळणार्‍या उपचारात अडथळा आणण्याचा प्रकार मात्र काही विघ्नसंतोषींकडून केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

जळगाव खुर्दच्या सरपंचाने लावला फलक

जळगाव खुर्दच्या परिसरात येणार्‍या या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण दाखल होत असल्याने कर्मचार्‍यांनी रूग्णालयात काम करण्यासाठी जाऊ नये व स्वत:ची व कुटूंबाची काळजी घ्यावी असा फलक गावात लावला आहे. प्रत्यक्षात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण दाखल केले जात नसून सरपंचाकडुन मात्र आरोग्यसेवेत अडथळा आणण्याच्या दृष्टीने गावातील नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. तसेच गोरगरीब रूग्णांनाही सेवेपासून वंचित ठेवण्याचाच प्रयत्न एकप्रकारे केला जात आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार अन् प्रांताधिकार्‍यांकडुन कानउघाडणी

जळगाव खुर्दच्या सरपंचाबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात आली. प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी तातडीने आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयास भेट दिली. याठिकाणी जळगाव खुर्दचे सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनाही बोलावण्यात येऊन त्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. तसेच शासकीय कामात अडथळा आणला म्हणून सरपंचावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

ग्रामसेवक देवरेंना कारणे दाखवा नोटीस

कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकामी सर्व प्रशासन विविध उपाययोजनांचे अंमलबजावणीसाठी दिवसरात्र काम करीत आहेत. असे असतांना मौजे जळगाव खुर्द येथील नागरिकांना व गोदावरी हॉस्पीटल येथील गावातील कर्मचारी यांना योग्य निर्देश देणे आवश्यक असतांनाही तसेच केल्याचे दिसून येत नाही. कर्तव्य बजावण्यात कसुर करणारे जळगाव खुर्दचे ग्रामसेवक संजय एकनाथ देवरे या ग्रामसेवकास जळगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावुन २४ तासाच्या आत खुलासा मागविला आहे. तसेच खुलासा सादर न केल्यास कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.