जळगाव। शहरातील आरटीओ कार्यालयातील वारंवार सर्व्हर बंद होत असल्याने त्याचा फटका बाहेरगावावरुन आलेल्या नागरिकांना बसत आहे. गुरुवारीही दुपारी अचानकपणे सर्व्हर बंद झाल्याने वाहन परवाना नुतणीकरणासाठी गेेलेले जळगाव जागृत मंचचे अध्यक्ष शिवराम पाटील यांनी कार्यालय आवारात संताप व्यक्त केला. यानंतर त्यांनी चक्क मंत्री, राजकारणी व सरकारी अधिकार्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. दरम्यान, सर्व्हर बंद झाल्यामुळे नागरिकांची आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
दुपारी एक वाजता सर्व्हर बंद
जळगाव जागृत मंचचे अध्यक्ष शिवराम पाटील हे गुरूवारी दुपारी वाहन परवाना नूतनीकरणसाठी आरटीओ कार्यालयात आले होते. आरटीओचे सर्व कामे ऑनलाईन असल्याने एक वाजता सर्व्हर हॅँग होवून बंद पडले. त्यामुळे कामांना विलंब झाला. अनेक नागरिक रांगेत सर्व्हर सुरु होण्याची प्रतिक्षा करीत असताना पाटील यांनी खिडकीजवळच यंत्रणेच्या कर्मचार्यांविरुध्द संताप व्यक्त करुन सरकारी अधिकारी, मंत्री, आमदार व राजकीय नेत्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. शिवराम पाटील यांचा हा प्रकार पाहून त्यांच्याभोवती गर्दी गोळा झाली होती.
सहाय्यक परिवहन अधिकार्यांना विचारला जाब
सर्व्हरची अडचण दूर करावी यासाठी वरिष्ठ अधिकार्यांनी बाहेर यावे या मागणीसाठी त्यांनी गोंधळ घातला. ऑनलाईन काम बंद करुन पुर्वीप्रमाणेच काम सुरु करा अशी मागणी ते करु लागले. त्यानंतर काही वेळाने शिवराम पाटील लोकांना घेवून सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विकास बर्हाटे यांच्या दालनात गेले. सर्व्हर का? बंद पडले,
ते केव्हा सुरु होईल.
बेबसाईट नेहमी पडते बंद
याचा जाब त्यांनी विचारला. त्यावर हे सर्व बंद होणे किंवा सुरु होणे हे आमच्या हातात नाही. केंद्र सरकारने सुरु केलेली ही वेबसाईट आहे. देशभरात एकाच वेबसाईटवर काम चालत असल्याने ते नेहमी बंद पडते, मात्र त्यामुळे ग्राहकांना दंडाचा भूर्दंड बसत नसल्याचे बर्हाटे यांनी स्पष्ट केले. त्यावर ही समाधान न झाल्याने पाटील यांनी मी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी बोलतो,बंद पडलेले सर्व्हर मी सुरु करुन देतो असे सांगून बराच वेळ बर्हाटे यांच्याशी वाद घातला.