जळगाव जिल्हा परिषदेत सत्तेसाठी महाविकास आघाडीची मोट

0

खडसे समर्थकांची भूमिका निर्णायक, अध्यक्षपदासाठी 3 रोजी निवडणूक

जळगाव – राज्यात सत्तास्थापनेसाठी काँग्रेसचीच भूमिका निर्णायक ठरली होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसने महाविकास आघाडीसाठी ताणून धरले होते. त्याचप्रमाणे जळगावच्या जिल्हा परीषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसने होकार दिल्यानंतर आज महाविकास आघाडीची मोट बांधण्यात आली. दरम्यान ही मोट मात्र कितपत यशस्वी ठरते हे दि. 3 रोजी होणार्‍या निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

जळगावच्या जिल्हा परीषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी दि. 3 रोजी निवडणूक होऊ घातली आहे. भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची एकत्रीत आघाडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष कार्यालयात त्यांच्या पक्षाच्या 15 सदस्यांची बैठक घेतली. त्यानंतर शिवसेना नेते आ. गुलाबराव पाटील यांच्याशी देखिल त्यांनी चर्चा केली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी तयारी केली असली तरी काँग्रेसच्या सदस्यांना सोबत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या चारही सदस्यांशी आणि प्रमुख नेत्यांशी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असल्याचे राष्ट्रवादीचे अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी सांगितले.

काँग्रेस महाविकास आघाडीत जाणार

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी आज पद्मालय विश्रामगृह येथे पक्षाचे निरीक्षक माजी आ. अनिल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व जिल्हा परीषद सदस्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर जिल्हा परीषदेत भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी काँग्रेसने देखिल महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी कळविले आहे.

जिल्हा परिषदेत सत्तांतर होणे अवघड

जिल्हा परीषदेत पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपाचे 33, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादीचे 15 तर शिवसेनेचे 13 सदस्य आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक सदस्य अपात्र आहेत. त्यामुळे बहुमतासाठी आता 33 हा मॅजीक फिगर आहे. भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जरी महाविकास आघाडी करण्याचे ठरविले तरी देखिल सत्ता स्थापन करणे अवघड दिसत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषदेत बहुमत आणि अध्यक्ष आमचाच – आ. गिरीष महाजन

जिल्हा परिषदेत कुणी कुठलीही आघाडी करो आमचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे जिल्हा परीषदेत अध्यक्ष पुन्हा भाजपाचाच होईल अशी माहिती माजी मंत्री आ. गिरीष महाजन यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना दिली. जिल्हा परिषदेत कुठलाही पॅटर्न यशस्वी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

११ सदस्य खडसे समर्थक

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे जिल्हा परिषदेत जवळपास 11 सदस्य समर्थक आहेत. खडसेंनी पक्षांतराचा निर्णय घेतल्यास हे समर्थक सदस्य देखील त्यांच्या सोबत राहतील आणि जि.प.मध्ये सत्तांतर घडवून आणतील, असा आशावाद राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लागला आहे. त्यामुळे खडसे समर्थकांच्या या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.