जळगाव : मुक्ताईनगरमधील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांची माघार हि जाणीवपूर्वक केलेली तडजोड असल्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी आज जळगावात केले.
भाजप-शिवसेनेला पराभूत करणे हेच आमचे एकमेव लक्ष असल्याने काही ठिकाणी जाणीवपूर्वक तडजोड केल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. एकेकाळी जळगाव जिल्हा विकासाच्या दृष्टीने अग्रेसर होता मात्र जिल्ह्यातल्या स्थानिक राज्यकर्त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे हा जिल्हा मागे राहिला आहे. जळगाव जिल्ह्यात रस्ते अस्तित्वात आहे कि नाही असा प्रश्न पडत असल्याचे देखील शरद पवार म्हणाले.
कलम 370 या मुद्या संदर्भात बोलतांना खासदार शरद पवार म्हणाले की, राज्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षात सिंचन शेतकरी आत्महत्या कर्जमाफी रस्ते यासारखे प्रश्न प्रलंबित ठेवले. त्यामुळे त्यांना सांगण्यासारखे काही नसल्याने कलम 370 या मुद्द्याचा वापर केला जात आहे. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता काही जण ज्योतिषाचा सल्ला घेऊन भविष्य वर्तवितात अशी खिल्लीही खासदार शरद पवार यांनी उडवली. यावेळी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार तथा राष्ट्रवादीचे पुरस्कृत चंद्रकांत पाटील या देखील उपस्थित होते.