दोन महिन्यात चौकशी करणार; विधानसभेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा
माजी मंत्री एकनाथराव खडसे पुन्हा आक्रमक
मुंबई :- जळगाव जिल्हा परिषदेसह सहा जिल्हा परिषदेत अपंग युनिटमध्ये बनावट कागदपत्राच्या आधारे विशेष शिक्षक भरती करण्यात आली. या शिक्षक भरतीची चौकशी सनदी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमण्यात येवून दोन महिन्याच्या चौकशी पूर्ण केली जाईल व पुढच्या अधिवेशनात चौकशी अहवाल सभागृहासमोर सादर केला जाईल अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी सभागृहात केली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा आक्रमक बाण्याचा सामना यावेळी शिक्षणमंत्र्यांना करावा लागला.
कार्यवाही अत्यंत चुकीच्या पध्दतीने
विधानसभेत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे ,अजय चौधरी यांनी लक्षवेधीव्दारे जळगाव जिल्हा परिषदेमध्ये २०१७ पर्यंत अपंग युनिटमधून जिल्हा परिषदेअंतर्गत विशेष शिक्षक, परिचर समायोजन करण्यासाठी सरकारने मान्यता दिली. त्यानुसार विशेष शिक्षक, परिचर यांनी सामान्य शिक्षक या पदावर समायोजनाने सामावून घेण्याची करण्यात आलेली कार्यवाही अत्यंत चुकीच्या पध्दतीने करण्यात आली असल्याचे सांगितले. 2014 ते 2017 या काळात नाशिक विभागात शिक्षण उपसंचालक यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अपंग युनिट तयार केले. बनावट कागदपत्रे वापरून नोकऱ्या मिळवल्या आणि नोकऱ्या दिल्या त्यांना तात्काळ निलंबित करून कारवाई करणार का? असा सवाल करत खडसे यांनी तपासात हे सगळे समोर आले असल्याचे सांगितले. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार का? असा सवाल केला.
८ वर्षापासून पाठपुरावा करतोय
राज्य सरकारने ही शिक्षक भरती केवळ ५९४ पदासाठी करण्याचे शासन निर्णय काढलेला असतांना याची यादी अद्याप सरकाकडून मिळालेली नाही. जळगाव आणि नाशिक जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्राच्या आधारे ही शिक्षक भरती करण्यात आली. सहा जिल्हा परिषदेत सूमारे ६ हजार शिक्षकांची नियुक्ती केली असून यामध्ये मोठे रॅकेट कार्यरत आहे. शिक्षण आणि ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून बनावट परिपत्रकाच्या आधारे झालेल्या शिक्षक भरती प्रकरणी गेल्या ८ वर्षापासून पाठपुरावा करीत असून सरकारकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, असेही खडसे यांनी सांगितले. जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केलेला आहे. या अहवालाच्या आधारे दोंषीविरूध्द कारवाई करावी अशी मागणी खडसे यांनी केली.
कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही शिक्षक भरती सहा जिल्हा परिषदा आणि दोन विभागाकडून अपंग युनिटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची सनदी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमण्यात येईल. ही समिती दोन महिन्यात संपूर्ण चौकशी करेल. पुढच्या पावसाळी अधिवेशनात एसआयटीच्या चौकशीचा अहवाल सभागृहासमोर सादर केला जाईल. यामध्ये कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल अशी घोषणा केली.
मी भांडून-भांडून थकलो- खडसे
– या प्रकरणी २०१२ सालापासून मी भांडतोय. विरोधी पक्षनेते असताना आणि मंत्री असतानाही याबाबत बोललो मात्र न्याय मिळाला नाही, असे खडसे यांनी उद्विग्नपणे सांगितले. शालेय पोषण आहारात फौजदारी गुन्हे दाखल करतो, कारवाई करतो असे सांगितले होते पण त्यांच्यावरही कारवाई झाली नाही. शासनाने त्यांना पाठिशी घालण्याचाच प्रयत्न केला. मी भांडून भांडून थकलो, पण कारवाई होत नसल्याचे खडसे म्हणाले.