जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना दिलासा : शंभर कोटींपर्यंत दावे मंजूर होण्याचे संकेत

0

लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा मोलाचा; पीक विमा काढलेल्या केळी उत्पादकांना लवकरच मिळणार भरपाई

भुसावळ- खान्देशात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या वादळी वार्‍यामुळे सुमारे एक हजार 500 हेक्टरवरील केळी आडवी पडून कोट्यवधींचे नुकसान झाले होते. केळी उत्पादकांना भरीव मदत मिळावी यासाठी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची माजी महसूल व कृषीमंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदू महाजन, माजी सभापती सुरेश धनके आणि शिष्टमंडळाने भेट घेत भरपाई देण्याची मागणी केली होती. दोन दिवसांपूर्वी खासदार रक्षा खडसे यांनी पुनः केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांची भेट घेवून केळी उत्पादकांना मदतीचा हात सरकारने द्यावा, अशी विनंती केली. कृषी मंत्र्यांनी पीक विमा काढलेल्या व नुकसानभरपाईच्या निकषांमध्ये बसणार्‍या केळी उत्पादकांचे 100 कोटींचे दावे मंजूर करण्याचे याप्रसंगी संकेत दिले.

निकषात न बसणार्‍या केळी उत्पादकांना दिलासा
केळी उत्पादकांचे झालेले नुकसान पाहता ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा संरक्षण घेतले आहे परंतु नुकसानभरपाईसाठी असणार्‍या निकषांमध्ये बसत नाहीत अशा केळी उत्पादकांसाठी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांचे अधिकारी यांची तातडीची बैठक घेण्यात आली. पीक विमा घेतलेल्या परंतु नुकसानभरपाईच्या निकषांमध्ये न बसणार्‍या केळी उत्पादकांना सुद्धा मदत करण्यात येणार असल्याचे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.