जळगाव– जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेने जोरदार यश मिळवले असून या दोन्ही पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांनी अल्प अपवाद वगळता आपापले गड राखण्यात यश मिळवले आहे.
माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी आपल्या मतदारसंघातील मुक्ताईनगर आणि बोदवड या दोन्ही तालुक्यांच्या पंचायत समित्या ताब्यात घेतल्या असून जिल्हा परिषदांमध्येही वर्चस्व मिळवले आहे. याच पध्दतीने जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील सात पैकी पाच जागा भाजपला मिळाल्या असून पंचायत समितीत सत्ता मिळाली आहे. सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असणार्या पाळधी-बांभोरी तसेच म्हसावद-बोरनार या जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेनेला विजय मिळाला आहे. याचप्रमाणे त्यांचे कट्टर विरोधक पी.सी. पाटील यांच्या सौभाग्यवतीचा पराभव करण्यातही त्यांना यश लाभले आहे. जळगाव तालुक्यात मात्र भाजपला दोन तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. त्यांनी धरणगाव आणि जळगाव पंचायत समित्यांची सत्ता शिवसेनेकडे खेचून आणली आहे. आमदार हरीभाऊ जावळे यांच्या मतदारसंघातील यावल आणि रावेर या दोन्ही पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. पारोळ्यात आमदार डॉ. सतीश पाटील यांना नगरपालिका निवडणुकीत धक्का बसला होता. मात्र राष्ट्रवादीने पंचायत समिती काबीज केली आहे. चाळीसगावात मात्र आ. उन्मेष पाटील यांना काही प्रमाणात धक्का बसला आहे. त्यांच्या झेडपीत तीन तर राष्ट्रवादीच्या चार जागा आल्या आहेत. तर पंचायत समितीचा मुकाबला मात्र बरोबरीत अर्थात ‘टाय’ झालेला आहे. भुसावळात आ. संजय सावकारे यांनी पंचायत समितीत भाजपची सत्ता कायम राखली असून त्यांच्या वहिनीला झेडपीत निवडून आणले आहे. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अनपेक्षितपणे प्रत्येकी एक जागा मिळवल्याने त्यांनाही काही प्रमाणात धक्का बसला आहे. याचप्रमाणे चोपड्यात भाजपला पंचायत समितीत सत्ता संपादन करण्यासाठी शिवसेनेचा पाठींबा आवश्यक असेल. मात्र जिल्हा परिषदेत भाजपने जोरदार मुसंडी मारून सर्वांना चकीत केले आहे. अमळनेरमध्ये अनिल भाईदास पाटील यांच्या सौभाग्यवतींचा विजय झाला असला तरी राष्ट्रवादीला अन्यत्र यश लाभले नाही. भाजपने झेडपीत उत्तम यश संपादन केले असून पंचायत समितीची सत्ताही काबीज केली आहे. येथे आमदार शिरीष चौधरी यांना धक्का बसला आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांना संमिश्र यश मिळाले आहे. पाचोरा आणि भडगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये त्यांनी झेडपीत चांगले यश मिळवले आहे. मात्र भाजपने पाचोरा तालुक्यात चांगले बस्तान बसवत जिल्हा परिषदेच्या दोन जागांसह पंचायत समितीची सत्तादेखील मिळवली आहे. मात्र शिवसेनेने भडगाव पंचायत समितीत सत्ता मिळवल्याने आ. पाटील यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.