जळगाव:जळगाव जिल्ह्यातील सात विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील एकूण 11 विद्यार्थी हे लॉकडाऊनमुळे केरळमधील कोट्टायम येथे अडकले आहेत. आपल्या मूळ गावी परतण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी आता लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहेत.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील एकूण 11 विद्यार्थी हे रेल्वेमधील अॅप्रेटिंसशिपसाठी कोट्टायम या ठिकाणी गेले होते. हे प्रशिक्षण संपून केवळ लॉकडाऊन असल्याने या विद्यार्थ्यांना आपल्या गावी येता आलेले नाही. हे सर्वजण सध्या रेल्वेच्या निवासस्थानात राहत आहे. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर सुरुवातीला त्यांना रेल्वे कामगार युनियनमार्फत शिधा मिळाला होता. त्यांच्या निवासस्थानापासून साडेचार किमी अंतरावर एक मॉल आहे. तेथून त्यांना भाजी व इतर साहित्य आणता येते. त्यासाठी केवळ दोन जणांना जाण्यास परवानगी आहे. मात्र, गेल्याच आठवड्यात या भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर भाजी बाजार बंद झाला आहे.
केरळमध्ये देशाच्या अन्य भागांच्या तुलनेपेक्षा पाऊस लवकर सुरू होतो. गेल्या वर्षी या राज्यात पावसाने हाहाकार उडाला होता. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपापल्या मूळ गावी परतण्यासाठी या मुलांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांचे पालक लोकप्रतिनिधींशी संपक साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुलांना परत आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा हर्षल अहिरराव या मुलाचे पालक सुरेश अहिरराव (जळगाव) यांनी व्यक्त केली आहे.
भुसावळ, जळगाव, जामनेरमधील विद्यार्थी
कोट्टायम येथे असलेल्या मुलांमध्ये विनायक सुरेश धनगर (वरणगाव, भुसावळ), हर्षल सुरेश अहिरराव, किरण दत्तात्रेय सपकाळे, राकेश गणेश जगताप, छगन राठोड (जळगाव), तुषार सुभाष कोलते (तळवेल, भुसावळ), शुभम श्यामराव गव्हारे (जामनेर), प्रशांत पुंडलिक धोबे (पिंपरी, यवतमाळ), निकेश सुधाकर वारंभे (नागभिड, चंद्रपूर), विश्वेष सुनील बारमासे (नागपूर), अत्तदीप सारनाथ मेश्राम (पिंपळगाव भोसले, चंद्रपूर).