जळगाव – जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची वॉश आऊट मोहिम जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चोपडा आणि पारोळा तालुक्यातील अवैध गावठी व हातभट्टी दारु तयार करणार्या हातभट्ट्यांसह ढाब्यांवर एकूण 19 ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत सुमारे दोन लाख 31 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
एकाचवेळी धडक कारवाई
जिल्ह्यात अवैध गावठी दारु कारखाने सुरु असून मोठ्या प्रमाणात गावठी दारु तयार करुन त्याची विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांना मिळाल्यानंतर सोमवार, 14 फेब्रुवारी रोजी सकाळपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासह नाशिक विभागाच्या भरारी पथकांनी पाचोरा तालुक्यातील गिरड, भडगाव तालुक्यातील टोणगांव, पारोळा तालुक्यातील तामसवाडी, चोपडा तालुक्यातील खाचणे याठिकाणावरील अवैध हातभट्टी दारु निर्मितीच्या केंद्रावर आणि इतर ठिकाणी सुरू असलेले अवैध गावठी व हातभट्टी दारु तयार करणारे कारखान्यांसह ढाबे असे एकूण 19 ठिकाणी कारवाई करुन उद्धवस्त करण्यात आले. या कारवाईत चार हजार 290 लीटर कच्चे रसायन, 135 लीटर गावठी दारू मिळून एकूण दोन लाख 31 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई निरीक्षक अरुण चव्हाण, किरण पाटील, चंद्रकांत पाटील, सुजित कपाटे, निरीक्षक विकास पाटील, माधव तेलंगे, रींकेष दांगट, विलास पाटील, आनंद पाटील, सत्यविजय ठेंगडे, विठ्ठल लहाके, लोकेश गायकवाड, नरेंद्र पाटील, अजय गावंडे, कुणाल सोनवणे, शशिकांत पाटील, प्रकाश तायडे, नितीन पाटील यांच्या पथकाने केली.