जळगाव जिल्ह्यात सातबारा उतारा वितरण ठप्प

जिल्ह्यातील 525 मंडळाधिकार्‍यांसह तलाठ्यांकडून डिजिटल सिग्नेचर तहसीलदारांकडे जमा

भुसावळ (गणेश वाघ) : जिल्ह्याच्या सातबारा संगणकीचा सर्व्हर गेल्या महिनापासून अतिशय संथ गतीने सुरू असल्याने सातबारा उतारे निघत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर नागरीक भांडण करीत असतानाही दखल घेतली जात नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर जळगाव जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष एन.आर.ठाकूर यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील 525 मंडळाधिकार्‍यांसह तलाठ्यांकडून डिजिटल सिग्नेचर तहसीलदारांकडे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 3 व 4 मार्चदरम्यान मंडळाधिकारी व तलाठी आपापल्याकडील डिजिटल सिग्नेचर की तहसीलदारांकडे जमा करीत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

तक्रारीची दखल न घेतल्याने सिग्नेचर जमा
डिजिटल सिग्नेचर जमा करण्याचा प्रकार यापूर्वीदेखील घडला असून वारंवार तक्रारी केल्यानंतर वा काम बंद केल्यानंतर सुधारणा करण्यात येत असल्याने तला व मंडळाधिकारी बांधवांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एन.आर.ठाकूर यांच्या आदेशानुसार, गत एक महिन्यांपासून जळगाव जिल्ह्याचा 7/12 संगणकीकरणाच्या सर्व्हरला स्पीड अत्यंत कमी असून वारंवार सर्व्हर बंद पडत असल्याने सातबारा वितरणात अनंत अडचणी येत आहेत मात्र नागरीक याबाबत मंडळाधिकारी तथा तलाठी यांच्याशी वाद करीत असल्याने त्यांनी जिल्ह्याच्या डीआयएलआरएमपी या गु्रपवर व्यथा मांडूनही राज्य समन्वय अधिकारी रामदास जगताप यांनी कुठलीही दखल न घेतल्याने डीएससी (डिजिटल सिग्नेचर) जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, तलाठी बांधवांनी डीएससी जमा करून सजेवर उपस्थित राहून दैनंदिन कामकाज करावे तसेच मार्च अखेर असल्याने प्राधान्याने वसुली प्राधान्य देवून जिल्ह्याची वसुली पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असेही ठाकूर यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, डिजिटल सिग्नेचर जमा झाल्याने आता जिल्ह्यात तलाठी तसेच मंडळाधिकार्‍यांकडून सातबारा उतारा देणे ठप्प झाल्याने नागरीकांची गैरसोय होणार असून प्रशासनाने तोडगा काढण्याची अपेक्षा आहे.