जळगाव जिल्ह्यात २४ पैकी ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू

0

जळगाव – जळगाव जिल्ह्याचा ऑरेेेंज झोनकडून रेडझोन कडे वेगाने प्रवास होत आहे. सोमवारी ४ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर काही तास उलटत नाही तोच मंगळवारी सकाळी अजून दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या वाढून २४ वर पोहचली आहे. गंभीर बाब म्हणजे यापैकी ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहरापाठोपाठ अमळनेर, भुसावळ व पाचोरा तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची डोकंदुखी वाढली आहे. मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी एक रूग्ण हा पाचोरा येथील ९२ वर्षीय पुरूष आहे. तर एक अमळनेर येथील ९० वर्षीय महिला आहे. या दोन्ही रूग्णांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

पाचोरा येथील पुरूष रूग्णाचा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झालेला आहे तर अमळनेर येथील कोरोना बाधित महिलेचा काल मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २४ झाली असून यापैकी नऊ रूग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहरातील १, पाचोरा १, अमळनेरातील ५ आणि भुसावळ शहरातील २ रुग्णांचा समावेश आहे.

जळगाव शहरातही तिसरा कोरोनाचा रुग्ण

जळगाव जिल्हा रुग्णालयात करोना सदृष्य लक्षणे असल्याने दाखल झालेल्या रुग्णांपैकी स्वॅब घेण्यात आलेल्या ५२ रुग्णांचे तपासणी अहवाल सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. यामध्ये ४ रुग्णांचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यात भुसावळातील ३ तर जळगाव शहरातील जोशी पेठेतील एका रुग्णाचा समावेश आहे. या बाधित रुग्णांपैकी २ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यातील एका रुग्णाचा तपासणीसाठी आणण्याअगोदरच मृत्यू झाला तर एका रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मृत्यू झाला. हे दोन्ही रुग्ण भुसावळ येथील होते. अमळनेर शहरापाठोपाठ आता भुसावळ शहरात देखील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. भुसावळात आतापर्यंत ५ करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जळगाव शहरातही तिसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यापूर्वी शहरातील मेहरूण आणि सालार नगरात करोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला होता. त्यापैकी मेहरूणमधील रुग्ण कोरोनातून बरा झाला आहे तर सालार नगरातील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता जोशी पेठेतही तिसरा रुग्ण आढळला आहे.