जळगाव तालुक्यात साडे दहा कोटींच्या विकासकामांचे आज भूमिपुजन

पालकमंत्र्यांचा पाठपुरावा; परिसरातील विकासाला येणार गती

जळगाव, दिनांक 18 (प्रतिनिधी) : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर करण्यात आलेल्या जळगाव तालुक्यातील तब्बल साडे दहा कोटी रूपयांच्या विकासकामांचे आज शुक्रवार दिनांक 19 रोजी भूमिपुजन करण्यात येणार आहे. आसोदा, ममुराबाद, नांद्रा आणि अवचीत हनुमान मंदिर येथे यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कामांमध्ये रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण आणि सभामंडपाच्या बांधकामांचा समावेश आहे. या माध्यमातून जळगाव तालुक्यातील विकासाला गती येणार आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जळगाव तालुक्यातील विविध गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या कार्यक्रमांचे भूमिपुजन आज शुक्रवारी आयोजीत कार्यक्रमांमध्ये होत आहे. यात आसोदा येथे सकाळी 9.30 वाजता , ममुराबाद येथे सकाळी 10.30 वाजता, नांद्रा येथे सकाळी 11.30वाजता तर अवचीत हनुमान मंदिर देवस्थानावर 12.00 वाजता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी राज्य मार्ग क्रमांक 6 वरील आसोदा ते देऊळवाडा दरम्यानच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि आसोदा येथील वडलांची वाट व इंदिरानगर ते कन्याशाळेच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण या कामासाठी 2 कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे. आसोदा ते देऊळवाडा दरम्यानच्या रस्त्याच्या विशेष दुरूस्तीसाठी 1 कोटी 26 लाख रूपयांच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे. आसोदा ते ममुराबादच्या दरम्यानच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी 3 कोटी 40 लाख रूपयांचे काम मंजूर करण्यात आले आहे. जळगाव ते विदगाव या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 2 कोटी 37 लाख रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. नांद्रा ते भोलाणे दरम्यानच्या रस्त्यासाठी 86 लक्ष रूपयांची तरतूद केलेली आहे. तर, अवचित हनुमान फाटा ते मंदिरापर्यंतचे काँक्रिटीकरण आणि मंदिर परिसरात सभामंडपाच्या कामासाठी 42 लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

हे राहतील उपस्थित
या सर्व कामांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज भूमिपुजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, पंचायत समितीच्या उपसभापती संगीताबाई समाधान चिंचोरे, पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, ज्योतीताई तुषार महाजन, शीतलताई कमलाकर महाजन आणि विमलताई लक्ष्मण बागूल यांची उपस्थिती राहणार आहे.