जळगाव पिपल्स बँकेत अंगावर पेट्रोल ओतून कर्जदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

0

नाहरकत दाखल्यासाठी फिरवाफिरव केल्याचा आरोप ; कायदेशीरपणे दोन मालमत्तांवर बोझा चढविल्याने संताप

जळगाव- जळगाव पिपल्स को आपरेटीव्ह बँक लिमिटेड या बँकेचा शेअर होल्डर व कर्जदार असलेल्या यशवंत लक्ष्मण खडके (रा. बांभोरी, व्यवसाय शेती) यांनी एनओसीची (ना हरकत प्रमाणपत्राची) मागणी करीत मंगळवारी दुपारी अडीच वाजता बँकेच्या मुख्य शाखेत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दरम्यान या कर्जदाराला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतरही बँकने 50 हजाराच्या कर्जापोटी घरासह प्लॉट अशा दोन मालमत्तावर बेकादेशीरपणे बोझा चढविल्याचा आरोप करत खडके यांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला होता.

50 हजार कर्जासाठी घरासह प्लॉटवर चढविला बोजा
जळगाव पिपल्स को आपरेटीव्ह बँक लिमिटेड या बँकेचा शेअर होल्डर व कर्जदार असलेल्या यंशवंत लक्ष्मण खडके यांनी 2002 साली बँकेकडून 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज न भरल्याने ते थकबाकीदार आहेत. पिपल्स बँकेच्या थकबाकीमुळे बँकेने बांभोरी येथील घरावर तसेच जळगावातील एका प्लॉटवर पिपल्स बँकेने बोजा चढविला असल्याची माहिती खडके यांच्या पत्नी यशवंत खडके यांनी बोलतांना दिली.

महापालिकेची भरावयाची आहे 10 लाखांची थकबाकी
खडके यांचा फुले मार्केटमध्ये 170 क्रमांकाचा गाळा आहे. मुदत संपलेल्या या गाळ्याच्या भाड्याची थकबाकी 10 लाख रुपये आहे. थकबाकीसाठी गाळा सील करण्याची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी थकबाकी भरण्यासाठी आवश्यक पैशांसाठी इंडियन शेल्टर बँकेत कर्जाचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, पिपल्स बँकेच्या घरावर तसेच जळगावातील एका प्लॉटवर पिपल्स बँकेने बोजा चढविला आहे. त्यामुळे इंडीयन बँकेने त्यांना कर्ज मंजूरीसाठी पिपल्स बँकेचे एनओसी मागीतली असल्याचेही खडके म्हणाले.

गोंधळ उडाल्यावर दिले नाहरकत प्रमाणपत्र
दोन दिवसांपासून यशवंत खडके पत्नी सीमा खडके हिच्याससह एनओसी घेण्यासाठी पिपल्स बँकेत येत आहे. मात्र त्यांची फिरवाफिरव करण्यात येत आहे. सोमवारी खडके दाम्पत्य बँकेत गेले असता, एकूण घेतलेल्या 50 हजाराच्या कर्जाच्या बदल्यात 10 हजार रुपये भरावयाचे सांगण्यात आले. यानंतर मंगळवारी या, एनओसी देतो, असे सांगण्यात आले. मंगळवारी खडके दाम्पत्य सकाळी 10 वाजेपासून आले. याठिकाणी अधिकारी रजेवर होते, येथील कर्मचार्‍यांनी एनओसी देण्यास असर्थता दर्शविल्याने यशवंत खडके यांनी सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानंतर बँकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली. कर्मचार्‍यांनी शहर पोलिसांना माहिती दिली, त्यानुसार कर्मचार्‍यांनी खडके यांना ताब्यात घेतले पोलीस ठाण्यात आणले. उशीरा सायंकाळी बँक अधिकारी व कर्मचार्‍यांनी खडके यांना शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. गोंधळ उडाल्यानंतर सायंकाळी उशीरा पीपल्स बँकेचे कर्ज विभागाचे हेमंत भट यांनी खडके यांना अटी शर्तीच्या अधिन राहून ना हरकत प्रमाणपत्र देखील दिले.

कोट
पिपल्स बँकेने घेतलेल्या 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी एकाच मालमत्तेवर बोजा चढविणे आवश्यक होते, मात्र बँकेकडून बेकायदेशीरपणे बांभोरी येथील घर तसेच प्लॉट या दोन मालमत्तावर बोजा चढविल्यात आला आहे. 50 हजाराच्या कर्जासाठी दरमहा 10 हजार रुपये व्याज भरत असून बँकेचे आम्ही लिंकिग शेअर होल्डर्स आहे, असे असताना बँकेकडून चुकीची वागणूक मिळाली. – सीमा खडके, यशवंत खडके यांच्या पत्नी

कोट
यशवंत खडके बँकेचे थकबाकीदार आहे. त्यांना एनओसी देत येत नसल्याचे त्यांना समजावीले. तसेच बुधवारी सकाळी 11 वाजता अटीशर्तीवर एनओसी देतो असे सांगीतले. मात्र, त्यांनी ऐकून न घेता अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. खबरदारी म्हणून आम्ही याबाबत पोलिसांना माहीती दिली.- हेमंत भट, कर्मचारी, कर्ज विभाग, जळगाव पिपल्स बँक