जळगाव : दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक आपल्या सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून बँक दरवर्षी विविध सामाजिक विषयांना अनुसरुन दिनदर्शिका छापून वितरण करीत असते. बँकेने विविध आधुनिक कॅशलेस सुविधा व इतर सेवांची संकल्पना घेवून दिनदर्शिकेची रचना केली आहे. बँकेच्या दिनदर्शिकेत नेहमीच तिथी, दिनविशेष, सणवार तसेच ग्राहक जनजागृतीपर सूचना अशा अतिशय महत्वाची माहिती पुरविली जाते. यावर्षी कॅशलेस बँकिंग व्यवहाराविषयी तसेच बँकेच्या संबंधित सेवा सुविधांना प्राधान्य दिले आहे.
बँकेची गौरवशाली परंपरेस दिल्या शुभेच्छा
स्थायी समिती सभापती डॉ.वर्षाताई खडके, युसुफभाई मकरा, प्रविणजी पगारीया, ज्ञानेश्वर मोराणकर, किशोर ढाके, जेष्ठ सभासद एस.बी.चौधरी, आसोदा हास्कूलचे चेअरमन अनिल महाजन, ग.स. सोसायटी तुकाराम बोरोले, नेत्ररोज तज्ञ डॉ.प्रेमलता महाजन यांचे शुभहस्ते बँकेच्या दिनदर्शिकेचा वितरण शुभारंभ करण्यात आला. अतिथींचा सत्कार बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. चेअरमन भालचंद्र पाटील यांनी प्रास्ताविकात बँकेची गौरवशाली परंपरा आणि आधुनिक सेवा याव्दारे होत असलेल्या प्रगतीबद्दल माहिती दिली आणि याचे श्रेय सर्व ज्येष्ठ सभासद, ग्राहक व शुभचिंतक यांना दिले. तसेच बँकेने सतत नाविन्यपूर्ण कल्पना बँकिंगमध्ये आणि समाज प्रबोधनातून समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. बँक अर्थव्यवहार करीत असतांनाही सामाजिक उत्तरदायित्व जपत असते, असे सांगितले. नोटाबंदीमुळे झालेल्या बदलांसह आपली बँकही कॅशलेस बँकिंग सुविधांना प्राधान्य देत आहे आणि आपणासही आवाहन आहे की बँकेच्या या सुविधांचा वापर करुन कॅशलेस व्यवहारांना चालना द्या.
सभासदांसह ग्राहकांची गर्दी
कार्यक्रमाचे मान्यवर अतिथी किशोर ढाके, तुकाराम बोरोले, एस.बी.चौधरी, युसुफभाई मकरा, प्रविण पगारीया व प्रा.डॉ.वर्षाताई खडके यांनी आपल्या मनोगतात बँकेने जपलेल्या पुर्वधुरीणांचे संस्कार, उदात्त विचार, प्रगतीशिल कार्यपद्धती, आणि कौटुंबिक जिव्हाळा याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि ते बँकेचे सभासद असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमास बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, संचालक प्रा.विलास बोरोले, सुनिल पाटील, चंदन अत्तरदे, राजेश परमार, अनिकेत पाटील तसेच शाखा सल्लागार समिती सदस्य, सहप्रबंध संचालक दिलीप देशमुख इतर मान्यवर तसेच बँकेचे सभासद व ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.