जळगाव । फ्रंटिअर इन को-ऑपरेटीव्ह या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्या संस्थेकडून तसेच नॅशनल बँकिंग को-ऑपरेटीव समिटतर्फे दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेस नुकतेच जयपुर येथे आयोजित केलेल्या सोहळ्यात मोठ्या नागरी सहकारी बँकांच्या विभागातून बेस्ट डिजीटल मार्केटींग पुरस्काराने गौरविण्यात आले. भगिनी निवेदीता बँकेच्या चेअरमन जयश्री कुरुंदवाडकर, चित्तौरगड अर्बन को-ऑप बँक लि.चे चेअरमन डॉ.एम.आय.सेठिया या मान्यवरांच्या शुभहस्ते व बँकिंग फ्रंटीअर्सचे बाबु नायर, मनोज अग्रवाल यांच्या उपस्थितीत बँकेच्या वतीने महाव्यवस्थापक संतोष वाणी, चिफ मॅनेजर अविनाश वैद्य, अमरावती शाखाधिकारी चंद्रशेखर गोडाळे व नंदुरबार शाखाधिकारी एस.बी.गावित यांनी पुरस्कार स्विकारला.
हे निकष केले पुर्ण
आर्थिक वर्ष 2016-2017 मध्ये बँकांकडून राबविण्यात आलेल्या सोशल मार्केटींग व मोबाईल मोबाईल मार्केटींग उपक्रमांतर्गत बँकेने समाजातील विविध ग्राहक वर्ग जसे वैयक्तीक खातेदार, व्यावसायिक संस्था तसेच युवावर्गास डिजीटल बँकिंग प्रणालीत सहभागी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या उज्वल कामगिरीचे निकष पुरस्कारासाठी पात्र ठरले.
डिजीटल ग्राहकांना जोडले
बँकेच्या शाखा असलेल्या ग्रामीण व शहरी भागांमध्ये शाळा, कॉलेजेस, रुग्णालये, व्यापारी संस्था, महिला बचत गट, हाउसिंग सोसायटीज, प्रशासकीय कार्यालये, गॅस एजन्सीज, औद्योगिक वसाहतीतील विविध उद्योग इ. ठिकाणी बँक व्यवस्थापनातर्फे डिजीटल बँकिंग सुविधांबाबतची माहिती देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना बँकेशी जोडण्यात आले.
सोशल मिडीयातून जागृही
मोबाईल मार्केटींग अंतर्गत बँकेच्या सेवासुविधा, बँकेचे मोबाईल अॅप्लीकेशन, प्रधानमंत्री विमा योजना, रुपे डेबिट कार्ड विमा योजना याबाबतची अद्ययावत माहिती वेबसाईट, इमेल, एसएमएस इ. सोशल मिडीया व्दारा ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात येत आहे. डिजीटल व्यवहारवाढीसाठी कॅशबॅक ऑफर तसेच पिओएस मशीन इन्स्टॉलेशन खर्चात व्यावसायिक ग्राहकांना विशेष सूट देण्यात आली.