जळगाव पोलिसांच्या मदतीने पुण्याच्या तरुणाची अधुरी प्रेम कहाणी पुर्ण

0

जळगाव । पुणे येथे नोकरीच्या निमित्ताने तेथील तरुण अन् जळगावची तरुणी यांच्यात मैत्री अन् मैत्रितून प्रेम बहरले. कुटुंबियांना न कळविता, दोघांनी वैद्यीक पध्दतीने आळंदी येथे लग्नही उरकून घेतले. या प्रेमविवाहाला मुलीच्या आईवडीलांनी त्याला विरोध दर्शविल्याने तरुणाची प्रेमकहाणी अधुरी राहिली होती. मुलीच्या आई वडीलांविरोधात पुण्याच्या तरुणाने पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची भेट घेतली. सज्ञान असल्याने अधीक्षक उगले यांनी तत्काळ दखल घेतली. अशाप्रकारे लग्न करुनही अपूर्ण असलेल्या प्रेमकहाणीचा जळगाव पोलिसांच्या मदतीने शेवट गोड झाला.

पोलीस अधीक्षकांकडे मागितली दाद
जळगावची कल्पना व पुण्यातील कल्पेश (दोघांची नावे बदललेली) हे नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे एकाच कंपनीत कामाला होते. याठिकाणी दोघांचे सुत जुळल्यावर दोघांनी लग्न करुन घेतले. कल्पना घरी आल्यावर प्रेमविवाहाला तिच्या आई वडीलांनी विरोध दर्शविला. कल्पना परत येत नसल्याने कल्पेशला शंका आली. फोन केल्यावर तिच्या आईवडीलांशी बोलणे झाल्यावर कल्पेशला प्रकार कळला. त्याने त्याच्या मेव्हण्यांसह जळगाव गाठले. आई वडीलांची भेट घेवून कल्पनाला सोबत पाठविण्याची विनंती केली. मात्र त्यांनी नकार दिला. आईवडीलांच्या दबावातून कल्पनाही नकार देत होती. वैदीक पध्दतीने लग्न करुन आईवडील नकार देत असल्याने अखेर कल्पेशने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची भेट घेतली अन् वस्तुस्थिती कथन करत दाद मागितली.

मियाँ-बिबी राझी तो क्या करेगा काझी…
मिया बिया राझी तो क्या करेगा काझी या म्हणीप्रमाणे सज्ञान असतांना लग्न करुनही आई वडील मुलीला पाठवित नसल्याचे समजल्यावर पोलीस अधीक्षकांनी तातडीने कल्पेशच्या तक्रारीची दखल घेतली. त्याची बाजू समजून घेतल्यावर तातडीने कल्पनाचे आई वडील राहत असलेल्या हद्दीनुसार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अरुण निकम यांना फोन करुन सुचना केल्या. त्यानुसार कल्पेशने पोलीस ठाणे गाठल्यावर पोलीस निरिक्षकांनी महिला कर्मचारी पाठवून कल्पनाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. तिला विचारले असता, तिने कल्पेशसोबत जाण्यावर ठाम असल्याचे सांगितले.

प्रेम जिंकले…आईवडीलही राजी
विरोध करणारे आई वडीलही मुलीच्या प्रेमापुढे हरले. अखेर राजी झाले. यानंतर आई वडीलांनी रिजीरिवाजाप्रमाणे कल्पनाला घरी नेवून तिची ओटी भरली. पोलीस ठाण्यातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन तिला कल्पेशसोबत पुण्याला रवाना केले.