लोहित मातानी अपर पोलीस अधीक्षकपदी : धुळे व नंदुरबारातील अधिकार्यांच्याही बदल्या
जळगाव- राज्यातील सहा विशेष पोलिस महानिरीक्षकांसह 95 आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश गृह मंत्रालयाने गुरुवारी रात्री जाहीर केले. त्यातील जळगाव, धुळ्यातील पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. जळगाव पोलीस अधीक्षकपदी नागपूर येथील राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक दत्ता शिंदे यांची बदली झाली असून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांचीही पोलिस उपमहानिरीक्षकपदी पदोन्नतीसह बदली झाली आहे मात्र त्यांना पदस्थापना देण्यात आलेली नाही. जळगावचे अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांचीदेखील पुणे शहर पोलीस उपायुक्तपदी बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर ग्रामीणचे (रामटेक विभाग) लोहित मातानी यांची नियुक्ती झाली आहे. धुळ्यातील पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांची पुणे राज्य राखीव दल (गट क्रमांक दोन) येथे समादेशकपदी नियुक्ती झाली असून त्यांच्या जागी पुणे शहर पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांची बदली करण्यात आली आहे. नंदुरबारचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांची अकोला येथे अपर पोलीस अधीक्षकपदी तर भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची मालेगाव अपर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
अधिकार्यांना मिळाला दिलासा
सुमारे दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून अधिकार्यांच्या बदली आदेशाची प्रतीक्षा लागून होती अखेर गुरूवारी रात्री उशीरा बदल्यांचे आदेश निघाल्याने अधिकार्यांना दिलासा मिळाला. एक -दोन दिवसात अधिकारी बदल्याच्या जागी हजर होणार आहेत.