सातत्याने जनसेवेचा डांगोरा पिटणार्या तसेच संस्कार-सेवा-साधनशुचितेचा आग्रह धरणार्या भाजपाचे जिल्हा कार्यालयातील पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित 3 टन प्रसार साहित्यांची अवघ्या 32 हजारात विक्रीची बाब संघीय वातावरणात वाढलेले कार्यकर्ते व स्वयंसेवकांना चक्रावून टाकणारी आहे. सेवाभावी कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केल्याचा दावा सतत केला, परंतू प्रदेश कार्यालयाहून जनतेत वाटपासाठी आलेले कोरे-करकरीत वैचारिक प्रसार-प्रचार साहित्य खोके उघडूनही न बघता परस्पर रद्दीच्या भावात टाकले जाते, तेव्हा भाजपाच्या एकूणच सेवा-समर्पण-संस्कार या त्रिसुत्रीबद्दल साशंकता व्यक्त होते.
विशेष बाब म्हणजे मागील महिन्यातच पं.दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त जळगावी ‘कार्यविस्तार वर्ग’ कार्यक्रम घेण्यात आला. त्यात लोकप्रतिनिधी, पदाधिकार्यांसमवेत प्रा.सुनिल नेवे, किशोर काळकर, शशिकांत वाणी, अजय आगरकर, सचिन पानपाटील आदींनी अभ्यासवर्गास संबोधित करतांना, ‘राजकारणात कार्यकर्त्यांचा तोल जायला नको, साधनशुचिता महत्वाची असून अभ्यासवर्गातून जातांना ती सोबत न्या, शेवटच्या माणसापर्यंत जाऊन काम करा आणि सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवा. पं.दिनदयालजींचे कार्य तळागाळात समजण्यासाठी जिल्हानिहाय समिती करणार आहे’ असे ठासून सांगितले होते. प्रचार-प्रसारासाठी 90 हजार बुथवरुन कार्यकर्ते घराघरात जातील असे सांगून, 15 दिवस राज्यात एकाच वेळी विस्तारक कार्यकर्त्यांसह बांधणी करतील, असे आश्वासित करण्यात आले होते, परंतू या विचार साहित्याची रद्दी विक्री प्रकरणाने जिल्हा भाजपाने या आश्वासनांना हरताळ फासल्याचे दिसून येते. एकंदरीत ‘बोलाचीच कढी बोलाचाच भात’ असाच प्रत्यय यानिमित्ताने आला आहे. पं.दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष व संघटनमंत्री यांचेकडे पाठविण्यात आलेले मौल्यवान वैचारिक साहित्य त्यांना प्राप्त होताबरोबर त्यांनी अग्रक्रमाने तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी यंत्रणा कार्यरत का केली नाही? हा महत्वाचा प्रश्न आहे. पक्षात कार्यकर्ता नावाची फळीच अस्तित्वात नाही की गटबाजीच्या ग्रहणाने ती खिळखिळी झाली हा कळीचा मुद्दा आहेच पण डझनावरी नेते असलेल्या भाजपात सत्तेच्या धुंदीमुळे ही बेफिकिरी वाढीस लागली आहे का? हे पाहणे गरजेचे आहे.
या प्रकरणी थातूरमातूर कारवाई दाखवून खरी नैतिक जबाबदारी असणार्यांना पाठीशी घातले जाईल का? सगळीकडे आमचीच सत्ता आहे, यापुढेही आमचीच राहणार ही दर्पोक्ती कायम ठेवून लोकप्रतिनिधी अन पदाधिकारी जर पक्षीय नेतृत्वाने पाठविलेला वैचारिक ठेवा जनतेपर्यंत पोहचविण्यात असमर्थ ठरत असतील तर निष्ठावंत स्वयंसेवक अन समर्पित कार्यकर्त्यांनी यापुढे संधीसाधू अन चमको नेतृत्वांचे अधिन राहून अजून कुठवर कार्य करावे? हे येणारा काळच सांगेल…
– संजय निकुंभ
7304155355