नितीन गडकरी ; घटना बदलण्याचे पाप काँग्रेस सरकारनेच केल्याचा भुसावळच्या सभेत आरोप ; काँग्रेसच्या नार्याने केवळ पार्टीसह चेल्या-चपाट्याची हटली गरीबी
भुसावळ- तब्बल 60 वर्षावर देशावर राज्य करून काँग्रेसने आताही गरीबी हटावोचा नारा दिला आहे मात्र या काळात देशाची गरीबी हटली नसलीतरी काँग्रेस पार्टीसह चेले-चपाटे व चमच्यांची मात्र गरीबी हटली, असा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भुसावळातील सभेत केले. भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी दुपारी संतोषी माता सभागृहात त्यांची जाहीर सभा झाली. याप्रसंगी गडकरी यांनी काँग्रेस सरकारवर टिकेची झोड उठवत घटना बदलण्याचे काम काँग्रेस सरकारने त्यांच्या काळात केले मात्र आता भाजपा सरकारचा अपप्रचार चालवून मतदारांशी दिशाभूल चालवली जात असल्याचे ते म्हणाले. खासदार रक्षा खडसे यांनी बहुमताने निवडून दिल्यास हतनूर धरणातील गाळ काढण्यासह जळगाव-भुसावळ दरम्यान हवेत चालणारी डबल डेकर बस सुरू करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, उमेदवार खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार चैनसुख संचेती, अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गरीबी हटली ती केवळ काँग्रेस पार्टीची
आपल्या 50 मिनिटांच्या घणाघाती भाषणात नितीन गडकरी म्हणाले की, 1947 मध्ये स्वातंत्र मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान स्व.पंडित नेहरू झाले. त्यानंतर स्व.इंदिरा गांधी व नंतर स्व.राजीव गांधी यांच्यानंतर मनमोहनसिंग पंतप्रधान आले तर आज पुन्हा गांधींचा नातू आता निवडणुकीत उभा आहे त्यामुळे गेल्या 60 वर्षांत देशातील मुस्लीम, दलित बांधवांची गरीबी हटली नसलीतरी काँग्रेस पक्षाची, त्यांच्या चेल्या-चपाट्यांची व चमच्यांची गरीबी हटली, असा आरोप त्यांनी करून उल्हास पाटील यांचे नाव न घेता काँग्रेसच्या काळात कुणाला मेडिकल कॉलेज मिळाले तर कुणाला इंजिनिअरींग व बी.एड.कॉलेज, प्राथमिक शाळा मिळाली व शिक्षक भरतीतून अर्धा-अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार हमी, अन् गावोगावी काँग्रेस-राष्ट्रवादीची रोजगार हमी, असे म्हणत काँग्रेसवर टिकेचा आसूड ओढला.
चुकीच्या नियोजनामुळे आज दुष्काळी स्थिती
काँग्रेस सरकारच्या काळात 70 हजार कोटींची विमाने खरेदी केली मात्र त्याची गरज नव्हती तर सिंचन, पाण्यासाठी हे पैसे खर्च केले असते ते तर आज राज्याची दुष्काळाची स्थिती राहिली नसती व शेतकरी आत्महत्या कमी झाल्या असत्या, असे गडकरी यांनी सांगत तुम्ही डोळे दान करू शकता मात्र विकासाची दृष्टी दान करू शकत नाही, असे सांगितले. पूर्वी नागपूर-मुंबई ट्रंक कॉलसाठी 66 रुपये लागायचे आता 40 पैसे लागतात तर विमानासाठी तेव्हा 12 हजार रुपये लागायचे आता मात्र एक हजार 200 रुपये लागतात, असे सांगून त्यांनी आपल्या कार्यकाळात 17 लाख कोटींची कामे केली असल्याचे सांगितले. 11 लाख कोटींची रस्त्यांची, पाच कोटींची शिपींगची, एक लाख कोटींची नमामी गंगा व वॉटर रीसोर्सेससाठी कामे केली तर आठ ते दहा लाख कोटींची कामे करू शकलो असतो मात्र वेळ कमी पडला, अशी कबुली त्यांनी देत या देशात पैशांची कमी नाही मात्र योग्य नेतृत्वाची कमी असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील 26 प्रकल्पांचे काम मार्गी
गडकरी म्हणाले की, प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून 25 टक्के निधी भारत सरकार व 75 टक्के नाबार्डमधून कर्ज देवून महाराष्ट्रातील 26 प्रकल्पांचे काम मार्गी लागले व त्यात शेळगाव बॅरेजचाही समावेश आहे. 108 प्रकल्पांची बळीराजा योजनेतून कामे झाली तर महाराष्ट्रातील 48 टक्के प्रकल्पांची क्षमता सिंचनापर्यंत नेण्याचे काम करण्यात आले. भाजपा सरकारने धरणांची कामे केली, रस्त्यांची कामे करताना पाण्याचा साठा करण्यात आला. मेगारीजार्च व जलपुर्नभरण योजनेचे काम खासदार रक्षा खडसे यांच्यामुळेच मार्गी लागल्याचे गडकरी म्हणाले. या योजनेमुळे महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही जे पाणी आता घेणार आहोत ते पाईपाने घेवून ते शेतकर्यांना ड्रीपने देवू त्यामुळे शेतकर्यांचे अडीच पटीने उत्पन्न वाढणार असल्याचे ते म्हणाले.
बुद्ध सर्किटसह राम सर्किटचे काम पूर्ण
गडकरी म्हणाले की, बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री भागात जलप्रलयामुळे भाविकांना अडचणी येत असल्याने सहा हजार 900 किलोमीटरचा मार्ग तयार करण्यात आला त्यामुळे भाविकांना पुढील वर्षांपासून वर्षभर यात्रा करता येणार आहे. उत्तर प्रदेशात दहा हजार कोटींची बुद्ध सर्किट योजनेतून कामे करण्यात आली तर राम सर्किटमधून 15 हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याशिवाय पंढरपूर-शेगाव, देऊळ-पंढपूर भागात रस्त्यांची कामे झाली. वारकर्यांच्या सोयीसाठी व त्यांचे पाय जळू नये यासाठी या मार्गावर गवताने रस्ते तयार करण्यात आले. मुंबईत 55 उड्डाणपूलासह मुंबई-पुणे एक्स्प्रेसचे कामे केली शिवाय दिल्ली ते मेरठ या 14 लेण एक्स्प्रेस हायवेचे 15 दिवसात काम पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले.
शिक्षा देणारे मजबूत सरकार
पाकिस्तानचा भारताने तीनवेळा पराभव करूनही पाकिस्तान सुधारायला तयार नाही, पुलवामा घटनेनंतर भारताने एअरस्ट्राईक केले कारण हे मजबूर नाही तर ‘मजबूत’ सरकार आहे, शिक्षा देणार सरकार आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. हा देश बदलण्याचे श्रेय जर कुणाला असेल तर त्या मतदाराला आहे, असे सांगत ते म्हणाले की, इमानदारीने गरीबाला जगता आले म्हणजे ‘रामराज्य’ आले, असेही ते म्हणाले. सुखी, संपन्न, समृद्ध राष्ट्राचा आमचा संकल्प आहे. या देशाची निवडणूक म्हणजे भारतीय जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक असल्याचे ते म्हणाले.
घटना बदलण्याचे काम काँग्रेस सरकारचे
आम्ही घटना बदलली, असा भाजपा सरकारचा दुष्पप्रचार विरोधक करीत आहेत मात्र काँग्रेस सरकारनेच घटना बदलल्याचे पाप केल्याचे गडकरी म्हणाले. जातीने कुणीही विशेष होत नाही तर गुणाने तो विशेष होत असतो, असे सांगून ते म्हणाले की, 34 कोटी लोकांचे बँक खाते उघडण्यात आले, सात कोटी लोकांना शेगड्या वाटप करण्यात आल्या, विविध योजना सुरू करण्यात आल्या व यात एकतरी योजना कुठल्या विशिष्ट धर्मासाठी आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवाद हा आमचा आत्मा असून सुशासन, विकास, अंत्योदय या त्रिसुत्रीवर भाजपा सरकार काम करीत असल्याचे ते म्हणाले.
200 वर्ष रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत
काँग्रेस सरकारने सिंचन घोटाळा केला मात्र आमच्या सरकारमध्ये एक रुपयांचा घोटाळा नाही, असे सांगून ते म्हणाले की, आम्ही बांधलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष खड्डे पडणार नाही, असा दावा करून ते म्हणाले की, खासदार रक्षा खडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यास हतनूर धरणाचा गाळ काढण्याबाबत आपण दखल घेवू तसेच भुसावळ ते जळगाव हवेत चालणारी डबल डेकर सुरू करू, त्यासाठी पैसा खर्च करण्याची गरज नाही केवळ डीपीआर द्या, असा विश्वासही त्यांनी मतदारांना दिला.