जळगाव-भुसावळ तिहेरी रेल्वेलाईनच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती

0
जळगाव – रेल्वे मंत्रालयाने राज्यातील अनेक प्रकल्पांना मंजूरी दिली असून त्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया, नव्याने रेल्वे लाईन टाकण्याची कामे आणि रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दिले. दरम्यान, यावेळी जळगाव-भुसावळ तिहेरी रेल्वेलाईन टाकण्याच्या कामाचा देखील त्यांनी आढावा घेतला.
मलबार हिल परिसरातील सह्याद्री राज्य अतिथीगृहात राज्यात सुरु असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांबाबत आढावा बैठक आज झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. प्रत्येक प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती रेल्वेमंत्री पियुष  गोयल यांनी घेतली व चालू वर्षासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या सूचना त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्या.
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-बल्लारशाह, कल्याण-कसारा, भुसावळ-जळगाव, पुणे-मिरज लोणावळा, मनमाड-जळगाव, वर्धा-नागपूर, गोरेगाव -बोरिवली, बोरिवली-विरार, कल्याण-आसनगांव कल्याण-बदलापूर, पनवेल-कर्जत, रोहा-वीर या मार्गावर दुसरी  आणि तिसरी रेल्वे लाईन टाकणे तसेच बेलापूर-सीवूड-उरण या नव्या रेल्वे कामाबाबतचे भूसंपादन, पनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनन्स आणि घाटकोपर-उरण या 14.5 किलो मीटरच्या लांबीसाठी भूसंपादनाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यु पी एस मदान , अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजेय मेहता तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.