अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची विधानसभेत माहिती
पुरवठा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार
मुंबई : अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या धान्य गोदामांमध्ये कशाप्रकारे रेशनच्या धान्यमालाची अफरातफर केली जाते, याचे पितळ माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी उघड केल्यांनतर या प्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. जळगाव आणि भुसावळ येथील शासकीय धान्य गोदामात धान्याचा घोटाळा झाल्याचे मान्य करत या बाबत दोषी सर्व संबंधितांवर विभागीय कारवाई सुरू असल्याची माहिती बापट यांनी लेखी उत्तरात दिली आहे. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याची मागणीही खडसे यांनी त्याचवेळी केली होती.
खडसे यांच्या तक्रारीनंतर मुंबईच्या दक्षता पथकाने जिल्ह्यात तपासणी केली होती. तपासणीच्या धास्तीने बाहेरून धान्य आणून गोदामातील गोण्यांमध्ये भरले जात असल्याचा प्रकार कुर्हा, मुक्ताईनगर येथे समोर आला होता. या गैरव्यवहारासंबंधी आ.सुरेश (राजूमामा) भोळे, संजय सावकारे यांच्यासह अनेक आमदारांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर लेखी उत्तरात गिरीश बापट यांनी पुढे माहिती दिली आहे की एकनाथ खडसे आणि संजय सावकारे यांनी काही गोदामांना अचानक भेटी देऊन पाहणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यांच्या तक्रारींवर शिधावाटप नियंत्रक, पुरवठा आयुक्त, नाशिक विभागीय आयुक्त यांच्या पथकाने 20 व 21 जानेवारी 2018 रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय गोदामांची अचानक पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी भुसावळ, चाळीसगाव, मुक्ताईनगर आणि कुऱ्हा काकोडा येथील गोदामात पुस्तकी शिल्लक आणि प्रत्यक्ष धान्यसाठा यात तफावत आढळली. त्याचबरोबर दर्जाहीन आणि अप्रमाणित धान्यसाठा ही आढळून आला.
या गोदामांची जबाबदारी असलेल्या दोन गोदाम व्यवस्थापक आणि दोन गोदामपाल यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन पुरवठा अधिकारी, तीन पुरवठा निरीक्षक यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिले गेले आहेत, अशीही माहिती गिरीश बापट यांनी दिली आहे. एका पुरवठा निरीक्षकाच्या वेतनवाढ रोखण्यात आली आहे. या प्रकरणात 13 गोदामात धान्याच्या थप्पीवर बिनकार्ड न लावणे, सर्व योजनेतील गहू, तांदूळ आणि इतर धान्य एकत्र ठेवणे, धान्याच्या थप्प्यांमध्ये पुरेसे अंतर नसणे, अशा किरकोळ त्रुटी आढळून आल्याने कडक समाज देऊन त्रुटी दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत, असेही या लेखी उत्तरात पुढे म्हटले आहे.