जळगाव मनपाची विकास योजना रखडण्याची शक्यता

0

सर्वेक्षण करणार्‍या कंपनीने दिला नाही अहवाल

जळगाव– तत्कालीन जळगाव नपा असतांना जुनी विकास योजना मंजूर झाली होती.2013 नंतर नवीन विकास योजना मंजूर झाली असून त्याची मुदत 2022 पर्यंत आहे.त्यामुळे जुनी आणि नवीन विकास योजना तयार करण्यासाठी पुणे येथिल जेनोलिथ जीओ या कंपनीला काम दिले आहे. या संस्थेने गेल्या तीन महिन्यात ड्रोन व जीडीपीएस द्वारे नकाशे तयार केल्याचा दावा केला असला तरी अद्याप त्याचा सुक्ष्म अहवाल मनपाला दिला नाही.त्यामुळे विकास योजना रखडण्याची शक्यता आहे.

जुन्या विकास योजनेची मुदत सन 2013 मध्ये संपुष्टात आली आहे. मात्र, शासनाला अनेकवेळा पाठपुरावा करुन देखिल महापालिकेला युनिट न मिळाल्याने विकास योजना तयार करण्यात आलेली नाही. तसेच महापालिकेची नवीन विकास योजनेचे देखिल मुदत सन 2022 मध्ये संपणार आहे. तत्कालीन नगरपालिकात असतांना सन 1993 मध्ये जळगाव शहराची जुनी विकास योजना मंजूर करण्यात आली होती. त्यामुळे महापालिका प्रशासन आता जुनी व नविन विकास योजना एकत्रित तयार करण्याच्या तयारीत आहे.

जेेनोलिथ जीआ कंपनीला दिले आहे काम

मनपा प्रशासनाने पुणे येथिल जेेनोलिथ जीओ या कंपनीला ड्रोन मॅपिंग, जीडीपीएस सर्व्हेक्षण, शहरात टोटल स्टेशन करणे, गाव नकाशे एकत्र करणे तसेच यावरुन मुळ नकाशा तयार करून विकास योजनेसाठी शासनाकडून येणार्‍या युनिटला मदत करण्यासाठी सप्टेंबर 2019 मध्ये कार्यादेश दिले असून यासाठी तीन कोटी 15 लाख इतकी मोबदला दिला जाणार आहे.

प्रशासनाने थांबविले बिल

जुनी व नवीन विकास योजना तयार करण्यासाठी कंपनीने नकाशा तयार करण्याचे काम पूर्ण केल्याचा दावा करुन पहिल्या टप्प्यातील बिल प्रतिपूर्तीसाठी महापालिकेकडे सादर केले आहे. मात्र, कंपनीने नकाशाचे केलेल्या कामाचा अहवाल अद्यापही सादर केलेला नाही त्यामुळे कंपनीचे बिल थांबविले आहे.