जळगाव मनपाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश

0

पाच गाळेधारकांच्या अपिलवर 22 ला सुनावणी

जळगाव-मनपा प्रशासनाने गाळेधारकांना बजावलेल्या कलम 81 ’क’च्या नोटीस आणि कारवाईला स्थगिती द्यावी यासाठी महात्मा फुले व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले आहे.या अपिलवर बुधवारी न्या.जी.ए.सानप यांच्यासमोर सुनावणी झाली.दरम्यान,पुढील सुनावणी दि.22 रोजी होणार असून मनपा प्रशासनाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिले.
मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्यासाठी प्रशासनाने 81 ‘क’ची नोटीस बजावून 11 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती.मुदतीत थकीत रक्कम न भरल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील प्रशासनाने दिला होता.तसेच आयुक्तांनी उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांना कारवाईसाठी प्राधिकृत केले आहे.त्यामुळे तीन दिवसापूर्वी उपायुक्तांसह मनपाचे पथक कारवाई करण्यासाठी फुले मार्केटमध्ये गेले होते.मात्र त्याठिकाणी गाळेधारकांनी विरोध केल्यामुळे वाद झाला होता. त्यामुळे उपायुक्तांनी वाद घालणार्‍या संबंधित गाळेधारकाविरुध्द गुन्हा दाखल केला.

स्थगितीसाठी पाच गाळेधारकांची न्यायालयात धाव
मनपा प्रशासनाच्या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी फुले मार्केटमधील शितलदास जवहराणी,आनंद नाथाणी,कांतीलाल डेडीया,सुभाष सराफ,वासुदेव गेही या पाच गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात धाव घेवून अपिल दाखल केले.याप्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. मनपा प्रशासनाने वितरीत केलेली बिले अयोग्य आहे,उपायुक्तांना कारवाईचे अधिकार नाही,कारवाईला स्थगिती मिळावी असा युक्तीवाद करुन गाळेधारकांच्यावतीने अ‍ॅड.के.बी.वर्मा यांनी बाजू मांडली.त्यानंतर मनपाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.केतन ढाके यांनी बाजू मांडली.गाळेधारकांकडे सात वर्षापासून थकबाकी आहे. नुकसान भरपाईची रक्कम भरणे गरजेचे आहे.कलम 81 ’क’ अन्वये 50 गाळेधारकांनी तर फुले मार्केटमधील 19 गाळेधारकांनी थकीत पूर्ण रक्कमेचा भरणा केलेला आहे.गाळेधारकांचे 81 ’ब’चे अपिल याआधी न्यायालयाने फेटाळले आहे.त्यामुळे स्थगिती देवू नये अशी मागणी करत अ‍ॅड.केतन ढाके यांनी युक्तीवाद केला. न्या.सानप यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर मनपाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी दि.22 रोजी होणार आहे.

कारवाईसाठी अडचण नाही
मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्यासाठी प्रशासनाने 81 ‘क’ची नोटीस बजावून 11 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. थकीत रक्कम न भरल्यामुळे गाळेधारकांवर कारवाई केली जाणार आहे. उर्वरित गाळेधारकांवर कारवाईसाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचे सुत्रांनी सांगितले.