जळगाव- महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी 55.72 टक्के मतदान झाले. कमी झालेल्या मतदानाचा फायदा नेमका शिवसेनेला की भाजपला? याचा निर्णय शुक्रवारी मतमोजणीनंतर कळणार आहे. दरम्यान, बुधवारी एकूण चार प्रभागांमध्ये रात्री 8.30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. महानगरपालिकेच्या 19 प्रभागांतील 75 जागांसाठी बुधवारी सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. निवडणुकीत 303 उमेदवार रिंगणात होते. शहरातील 469 मतदान केंद्रांवर दुपारी दोन वाजेपर्यंत तुरळक गर्दी होती. मात्र, दुपारी 3.30 वाजेनंतर मतदार घरातून बाहेर पडले. त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढायला सुरुवात झाली होती. शहरातील अनेक ठिकाणी दुपारी 3.30 वाजेनंतर गटागटाने मतदारांनी मतदान केंद्राकडे धाव घेतल्याने बहुसंख्य मतदान केंद्रांवर 5.30 वाजेनंतर रांगा लागल्या होत्या.
एमआयडीसीत मतमोजणी
महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी 9 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यंदा एमआयडीसीतील ’ई 8’ याठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या नियोजनाने मतमोजणी कक्ष उभारण्यात आले आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल, असा अंदाज आहे.