जळगाव-जळगाव महानगरपालिकेत भाजपने ७५ पैकी ५७ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळविले. दरम्यान १५ सप्टेंबर रोजी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात भाजपकडून आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची महापौरपदी निवड निश्चित झाली होती. तसेच उपमहापौरपदी अश्विन सोनवणे यांची निवड निश्चित करण्यात आली. आज औपचारिकरित्या त्याची घोषणा करण्यात आल्याने सीमा भोळे महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.
शिवसेनेने महापौर पदाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सीमा भोळे यांची ५७ विरुद्ध ० अशी निवड झाली. एमआयएमने तटस्थ भूमिका घेतल्याने मतदान केले नाही. हात उंचावून मतदान घेण्यात आले.
शिवसेनेकडून महापौरपदासाठी ज्योती महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र शिवसेनेने महापौर निवडीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या या निर्णयावर टीका होत आहे. शिवसेना भाजपशी सामना करू शकत नसल्याने त्यांनी बहिष्काराची भूमिका घेतली अशी चर्चा सुरु आहे.