जळगाव महानगरपालिकेचे अभियंता अरविंद भोसले अखेर बडतर्फ

शाखा अभियंता लुले यांना पदावनत करून केले कनिष्ठ अभियंता

जळगाव : जळगाव महानगरपालिकेचे सहायक अभियंता अरविंद भोसले यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. तर शाखा अभियंता गोपाळ लुले यांना पदावनत करत कनिष्ठ अभियंता पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सेवानिवृत्तीच्या एक दिवस आधी गुरुवारी आदेश जारी केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

न्यायालयाचे आदेश ठेवले कायम
सहा वर्षांपुर्वी नगररचनाचे सहायक संचालक चंद्रकांत निकम यांच्या बचावासाठी त्याच विभागाच्या सहा अभियंत्यांनी आयुक्तांना पत्र दिले होते. त्यात सहायक अभियंता अरविंद भोसले, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता गोपाळ लुले यांच्यावर तत्कालिन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी बडतर्फीची कारवाई केली होती. या कारवाईच्या विरोधात दोघांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. कारवाई करताना आयुक्तांनी प्रशासकीय प्रक्रीया पार पाडली नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे चौकशी अहवाल दिल्यानंतर दोघांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले होते. गेल्या आठवड्यात आयुक्त कुलकर्णी यांनी दोघांना बडतर्फ का करण्यात येऊ नये? अशा आशयाची नोटीस बजावली होती. त्यात लुले यांनी म्हणणे सादर केले. भोसले यांनी रजेवरून न परतता रजेचा कालावधी वाढवून घेतला. दरम्यान आयुक्तांनी गुरुवारी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुर्वीच्या आयुक्तांची कारवाई कायम ठेवत भोसलेंवर बडतर्फीची कारवाई केली. तर लुले यांना पदावनत करण्यात आले. लुले मे महिन्याच्या शेवटी सेवानिवृत्त होत आहेत.