जळगाव- जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात अर्थात साडेनऊ वाजेपर्यंत सरासरी 5 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. जळगाव मनपा निवडणुकीच्या 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 9 पक्ष निवडणूक लढत आहेत. मात्र खरा मुकाबला हा भाजपा व शिवसेनेत असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणास लागली आहे. दरम्यान, शहरातील प्रभाग 11 मधील बहिणाबाई माध्यमिक विद्यालयातील ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण आल्याचे सूत्रांनी सांगितले तर काही वेळात लागलीच मतदानाला सुरुवात झाली.
146 केंद्र संवेदनशील
शहरातील 35 ईमारतीतील 146 केंद्र संवेदनशील असून तेथे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या केंद्राचे व्हिडिओचित्रीकरणही केले जात आहे.
नेत्यांनी बजावला हक्क
माजी मंत्री सुरेशदादा जैन, त्यांच्या पत्नी रत्नाभाभी जैन व पूत्र राजेश जैन यांच्यासह आमदार सुरेश भोळे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.