जळगाव । शहरात वर्षभरानंतर महानगर पालिका निवडणुका होणार असल्याने तयारीला लागा, पक्षपातळीवरच्या ज्या नियुक्त्या बाकी आहेत त्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी एकत्र चर्चा करून कराव्यात, त्यांचा जनतेवरचा प्रभाव वेगळा असतो. वरिष्ठांकडून नियुक्ती होण्याची वाट नका पाहू. यावेळी निवडणुकीत जेवढा पैसा खर्च झाला तो मी यापुर्वी कधीच पाहिला नव्हता, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकत्यांच्या बैठकीत केले.
जैन भाजपकडे झुकलेले…
माजी खासदार ईश्वरलाल जैन म्हणाले की, येत्या निवडणुकीत खान्देश विकास आघाडी राहील की नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. प्रदीप रायसोनी यांनी आधीच एका नविन आघाडीची नोंदणी केलेली आहे. सुरेशदादा जैन हे भाजपाकडे झुकलेलेे आहेत, त्यामुळे याचे काही खरे दिसत नाही. यावेळी आ. डॉ. सतिष पाटील, गुलाबराव देवकर, गफ्फार मलिक, मनिष जैन, विजय चौधरी, माजी सभापती राजेंद्र पाटील, रविंद्रभैय्या पाटील, अनिल भाईदास पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
ताकद मतदारांना दिसली पाहिजे
ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातून पाच आमदार निवडून आणण्याची ताकद आपल्या पक्षात आहे. पण नेतेमंडळींनी ग्रामीण कार्यकर्त्याकडे लक्ष दिले पाहीजे, आपली ताकद मतदारांना दिसली पाहिजे. यावेळी विश्रामगृहात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिल कुमार शिंदे हे सुध्दा उपस्थित होते. मात्र ते पत्रकारांशी काहीच बोलले नाही. त्यांनी डॉ.उल्हास पाटील यांच्याशी एका बंद खोलीत चर्चा केली.