जळगाव- जळगाव विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व जळगाव महापालिकेतील ज्येष्ठ लढवय्ये नगरसेवक नरेंद्र अण्णा भास्करराव पाटील (58) यांचे रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास पुण्यातील रुबी रुग्णालयात निधन झाले. सुमारे महिनाभरापूर्वी नरेंद्र अण्णा घरात पडल्यामुळे त्यांच्या मणक्यांना दुखापत झाली होती तर पुण्यातील रूबी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती मात्र उपचार सुरू असताना रविवारी सकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
लढवय्या नगरसेवकाच्या अकाली निधनाने हळहळ
जळगाव महापालिकेतील विविध भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्यात नरेंद्र अण्णांचा सिंहाचा वाटा होता. लढवय्या नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सायंकाळपर्यंत त्यांचा मृतदेह जळगावात आणण्यात येणार असून रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.