जळगाव : महापालिकेत लोकाशाहीदिनात तक्रार देण्यासाठी आलेल्या जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील व अनिल नाटेकर यांनी आयुक्त व उपायुक्तांबाबत उर्मट भाषेत बोलून शिवीगाळ करून लोकशाही दिनाचा शासकीय दफ्तर फेकून चांगलाच गोंधळ घातला यामुळे सकाळी सतरा मजली इमारतीमध्ये सकाळी तणाव निर्माण झाला. या निषेधार्थ पोलिका अधिकारी व कर्मचारी यांनी कामबंदची घोषणा देत संबधितावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शहर पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. यातच पालिका कर्मचारी व अधिकार्यांनी गुन्हा दाखल होईपर्यंत शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. सायंकाळी अखेर जागृत जनमंचचे शिवराम पाटील व अनिल नाटेकर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
दर महिन्याचा पहील्या सोमवारी महापालिकेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. नव्या वर्षाचा पहीला लोकशाहीदिन आज सतरामजली इमारतीच्या दुसर्या मजल्यावर सकाळी 10 वाजेपासून सुरु होता. आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, शहर अभियंता दिलीप थोरात, लेखा परिक्षक निरंजन सैंदाणे, अस्थापना अधिक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सभागृहाबाहेर तक्रारींची तपासणी करण्यासाठी टेबल ठेवण्यात आला होता.
तक्रारवरून झाले वाद
सकाळी पावणे अकरा वाजता जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील व अनिल नाटेकर सभागृहाबाहेर असलेल्या टेबलाजवळ आलेत. त्यांनी त्यांच्यजवळीत तक्रार देण्यासाठी सभागृहात जाण्याची विनंती केली. यावेळी त्यांची तक्रार नियमानुसार वैयक्तिक स्वरुपाची नसून सार्वजनिक स्वरुपाची असल्याचे सांगण्यात आले. यामुळे नाटेकर, पाटील यांचा मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्याशी वाद झाला. त्यांना समजाविण्यासाठी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्यासह इतर अधिकारी बाहेर आलेत. मात्र अनिल नाटेकर व शिवराम पाटील यांनी ऐकून न घेता आयुक्त, उपायुक्तांबद्दल अपशब्द वापरुन त्यांना शिवीगाळ केली. टेबलवरील अर्ज व फाईली फेकून दिल्याचा आरोप उपायुक्तांसह अधिकारी यांनी केला. नाटेकर व पाटील यांनी उपायुक्त व अधिकारी यांच्याशी वाद सुरु ठेवल्याने गोंधळ होवून तणाव निर्माण झाला. यामुळे सभागृहात बसलेल्या आयुक्त सोनवणे यांनी शहर पोलिसांना फोन करुन बोलवून घेतले. पोलिस येइपर्यंत देखील नाटेकर, पाटील घोषणा देतच होते.
कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन
पोलिसांनी नाटेकर व पाटील यांना ताब्यात घेतल्यानतंर आयुक्त व उपायुक्तांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ संतप्त अधिकारी व कर्मचारी यांनी कामबंदचा नारा दिला. सर्व विभागातील कर्मचारी यांनी काम बंद करुन शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. शहर पोलिस ठाण्यात उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्यसह सर्व विभागप्रमुख व शेकडो मनपा कर्मचारी जमले सहाय्यक पोलिस निरिक्षक कोसे व यांची भेट घेवून जोपर्यंत नाटेकर व शिवराम पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका घेतली. सुमारे दोन ते तिन तास मनपा कर्मचारी तेथेच थांबून होते. सतरा मजली इमारतीच्या दार बंद करुन काम बंद असल्याचे सांगत कर्मचार्यांनी कामासाठी आलेल्या नागरिकांना परत पाठविले. वृत्त सर्वदूर पसरताच प्रभाग समिती कार्यालयांचे काम बंद करुन कर्मचारी पोलिस ठाण्यात आले. आयुक्त सोनवणे त्यांच्या दालनात तर महापौर नितिन लढ्ढा त्यांच्या दालनात बसून होते.
तक्रार बेकायदेशीर -आयुक्त
लोकशाही दिनात तक्रारीचा अर्ज 15 दिवस अगोदर देणे आवश्यक असते. लोकशाही दिनात केवळ वैयक्तिक स्वरुपाची तक्रार देण्यात येते. त्यात सेवा व राजस्व स्वरुपाच्या तक्रारी देता येत नसल्याची माहीती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. अनिल नाटेकर व शिवराम पाटील यांची तक्रार नियमाला धरुन नव्हती त्यांना समावून सांगीतल्यावरही त्यांनी शिवीगाळ करीत गोंधळ घातला त्यामुळे कर्मचारी संतप्त झाल्याने त्यांनी कामबंद आंदोलन केल्याचे आयुक्त सोनवणे यांनी सांगीतले.
एकतर्फी कारवाईचा आरोप
दरम्यान, शिवराम पाटील आणि अनिल नाटेकर यांनीही शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. यात नमुद करण्यात आले आहे की, ते दोन्ही जण आज लोकशाही दिनानिमित्त नागरी समस्यांबाबत तक्रार देण्यासाठी गेले होते. याप्रसंगी त्यांचा अर्ज दाखल करून घेण्यास मज्जाव करण्यात आला. यानंतर सभागृहातून उदय मधुकर पाटील, राजेंद्र पांडुरंग पाटील आणि एच.एम. खान यांनी बाहेर येऊन त्यांनी शिवीगाळ करत यांचा अर्ज घेऊ नका असे कर्मचार्यांना धमकावले. यानंतर सभागृहात बाहेर येत उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी दोघांचे अर्ज स्वीकारले. यानंतर उदय पाटील, राजेंद्र पाटील आणि खान यांच्यासह मनपाच्या 15-20 कर्मचार्यांनी नाटेकर यांना मारहाण केली. शिवराम पाटील आणि नाटेकर यांचा त्यांनी शहर पोलीस स्थानकापर्यंत पाठलाग केला. दरम्यान मनपाचे हे अधिकारी आणि कर्मचार्यांपासून आपल्या जीवास धोका असल्याचे पाटील आणि नाटेकर यांनी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारी अर्जात नमुद केले आहे. तर मनपा प्रशासनाच्या तक्रारीवरून लागलीच गुन्हा दाखल करणार्या पोलीस प्रशासनाने शिवराम पाटील आणि अनिल नाटेकर यांच्या अर्जाची दखल का घेतली नाही? असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी याबाबत नाशिकचे पोलीस महानिरिक्षक तसेच महाराष्ट्र पोलीस खात्याच्या ट्विटर अकाऊंटवर तक्रारदेखील केली आहे.