जळगाव : जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर अज्ञात समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री मेहरुन परीसरात रात्री पावणे अकरा वाजता घडली. कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या घरावर पेटते सुतळी बॉम्ब, दगड फेकल्याचा आरोप असून कारच्या काचाही फोडण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात 18 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिरवणूक जात असताना पेटते सुतळी बॉम्ब फेकले
मेहरुन परीसरात महापौर जयश्री महाजन यांच्या घराजवळून एका सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक जात असताना कार्यकर्त्यांनी महापौर महाजन यांच्या घरावर गुलाल फेकला तसेच काही वेळाने दगड आणि पेटते सुतळी बॉम्बसुद्धा फेकण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस कर्मचार्यासह अधिकार्यांनी महापौरांचे निवासस्थान गाठले आणि घटनेची माहिती घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, गजानन मालपुरे, सरीता कोल्हे, मानसिंग सोनवने यांनी रात्रीच महापौर जयश्री महाजन यांची भेट घेत घडला प्रकार जाणला.
बंदोबस्तात हलवली मूर्ती
उपद्रवींनी यावेळी कारच्या काचाही फोडल्या तर स्थानिक नागरीकांच्या मदतीने पोलिस बंदोबस्तात मूर्ती विसर्जनासाठी हलवली. या घटनेमुळप रीसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, घटना घडली त्यावेळी महापौर जयश्री महाजन घरी नव्हत्या. नुकतीच बायपास शस्त्रक्रिया झालेले त्यांचे सासरे एकटे घरी होते. यावेळी महाजनांच्या जाऊबाईंनी संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. घरात सासरे आजारी असल्याचेही सांगितले मात्र त्याकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले व समजूत घालणार्या महापौरांच्या जाऊबाई यांना मारहाण करत घरावर दगडफेक केली, अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली.
महापौरांचा पोलिसांवर गंभीर आरोप
या घटनेत पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताकडे दुर्लक्ष केल्याने हा हल्ला झाला असल्याचे महापौर जयश्री महाजन म्हणाल्या. जळगाव शहराच्या प्रथम नागरीकच या ठिकाणी सुरक्षित राहणार नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय असा सवाल ही जयश्री महाजन यांनी उपस्थित करून पोलिसांवर रोष व्यक्त केला आहे.