जळगाव । जळगाव जिल्हा पत्रकार संघ आणि रोटरी वेस्ट आयोजक तसेच नवजीवन परिवार व मराठा मंगल प्रायोजक असलेले जळगाव – महिला भुषण पुरस्कार 2017 साठी मान्यवर महिलांची नावे आज जाहीर करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल रुस्तोमजी शाळेच्या संस्थापक श्रीमती एच. डी. पेसूना, उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल श्रीमती लक्ष्मी नरेंद्र नारखेडे आणि उल्लेखनिय सामाजिक कार्य यासाठी वैशाली सूर्यकांत विसपुते यांना हे सन्मान जाहिर झाले. याशिवाय, राज्यस्तरावरील महिला गौरव सन्मानासाठी दिव्य मराठीच्या मधुरिमा पुरवणीच्या संपादिका सौ. मृण्मयी रानडे (मुंबई), रेडीओ सीटी 91.1 ची आरजे चैत्राली जावळे यांच्यासह भडगावची बाल शौर्य पुरस्कार विजेती निशा दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा पत्रकार संघ, रोटरी वेस्ट यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव जिल्हा पत्रकार संघ व रोटरी वेस्टने संयुक्तपणे हा महिलादिनाचा कार्यक्रम शनिवार 11 मार्च रोजी रोटरी भवन (मायादेवी नगर) येथे सकाळी 10.30 वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व जळगावमधील सुप्रसिध्द नवजीवन परिवार, मराठा समाजातील उपवर वर वधुंची मोफत नोंदणी करणारी संस्था मराठा मंगल यांचे आहे. हा कार्यक्रम महिलांचा गौरव आणि माध्यम क्षेत्रातील महिलांचे मार्गदर्शन अशा स्वरूपात आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या माजी संचालक व कवयित्री श्रध्दा बेलसरे, रोटरी डिस्ट्रीक्ट 3030 चे प्रांतपाल महेश मोकाळकर, उपप्रांतपाल डॉ. राजेश पाटील व जिल्हा पत्रकार संघ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुण्या दूरदर्शनवरील सुप्रसिध्द निवेदिका, सूत्रसंचालक, वृत्तसंपादक आणि कौन्सिलर ज्योती अंबेकर असतील. उद्घाटनानंतर बेलसरे व मोकाळकर यांचे महिलांचे सामाजिक प्रश्न या विषयांवर करणार आहेत.
महिलांना संधी यावर प्रकट मुलाखत
राज्यस्तर महिला गौरव सन्मान मृण्मयी रानडे, चैत्राली जावळे व निशा पाटील यांना आणि जळगाव – महिला भुषण सन्मान निवड झालेल्या महिलांना प्रदान होतील. यानंतर अंबेकर यांची माध्यम क्षेत्रात महिलांना संधी या विषयावर प्रकट मुलाखत रानडे, जावळे व पत्रकार यामिनी कुळकर्णी घेतील. या कार्यक्रमास उपस्थित राहणार्या 150 महिला, मुलींना आयएनआयएफडी या सुप्रसिध्द फैशन डिझाईनर संस्थेच्या संचालिका संगीता पाटील यांच्याकडून बी केअरफूल हे पुस्तक भेट दिले जाणार आहे. या पुस्तकात पौगंडावस्थेतील मुलींनी कुटुंबात व बाहेर वागताना काय काळजी घ्यावी ? या संदर्भात सल्ला, टीप्स व मार्गदर्शन आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे. जळगाव शहर व जिल्ह्यातील सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे असे आयोजन समितीतर्फे योगेश भोळे, संजय इंगळे, ड. राहूल लाठी, अनिल कांकरिया, डॉ. राजेश पाटील, विजय पाटील, अशोक भाटीया व दिलीप तिवारी यांनी कळविले आहे.