जळगाव- विघ्नहर्त्या गणरायाला अनंत चतुदर्शीच्या दिवशी निरोप दिला जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मेहरुण तलावावर मनपा प्रशासनातर्फे जय्यत तयारी सुरु आहे. विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी विसर्जन मार्गाची डागडूजी सुरु करण्यात आली आहे. मोठया मूर्ती क्रेनच्या माध्यमातून विसर्जन केले जाणार आहे.
गणपती विसर्जनासाठी महापालिकेतर्फे जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. बांधकाम विभागाकडून विसर्जन मार्गांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन दिवसापासून कोर्ट चौक ते दधिची चौक व रथ चौक ते बेंडाळे चौक, सिंधी कॉलनी, तांबापुरा, डी मार्ट ते शिरसोली रस्ता दुरुस्तीचे काम करून खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. तसेच विसर्जन रस्त्यांना सुरक्षा कठडे लावणे, तसेच पथदिवे लावणे आदी कामे केली जात आहेत.
क्रेनच्या सहाय्याने मोठ्या मूर्तींचे विसर्जन
मेहरुण तलावावरील गणेश घाटावर 5 फूट उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. पाच फुटापेक्षा अधिक उंच असलेल्या मूर्तींचे विसर्जन सेंट टेरेसा स्कूलच्या मागील भागात केले जाणार आहे. त्यासाठी तीन क्रेनची व्यवस्था केली आहे. गणेश घाटावर पाच फुटापर्यंत उंच मूर्तींचे विसर्जन 4 तराफे, एक बोट तर तीसपेक्षा अधिक पट्टीच्या पोहणार्यांची नेमणूक तलावावर केली जाणार आहे. तलावाजवळ वीज गेल्यास जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.
निर्माल्य संकलनाची व्यवस्था
महापालिकेतर्फे निर्माल्य संकलनासाठी व्यवस्था केली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्या मार्फत गणेश घाटावर तसेच मोठे गणपती मुर्ती विर्सजन चौपाटी ठिकाणी 4 कंटनेर, 4 घंटागाड्या, 4 ट्रॅक्टर, 2 स्किल लोडर निर्माल्य संकलनासाठी राहणार आहे. तलावा शेजारी शिवाजी उद्यान येथे निर्माल्याचे विलगीकरण ओल्याकचर्या द्वारे खताची निमिर्ती केली जाणार आहे. गणेश विर्सजनसाठी महापालिका प्रशासन सज्ज असून महापालिकेचे आरोग्य विभाग, लाईट विभाग, सार्वजनीक बांधकाम, अग्निशमन व आपत्ती विभागासह अन्य विभागाचे सुमारे दिडशे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहे.
सभापतींसह उपायुक्तांनी केली पाहणी
विसर्जन मिरवणूक मार्गाची मंगळवारी उपायुक्त मिनीनाथ दंडवते व स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी मार्गाची पाहणी केली. यावेळी मार्गातील स्वच्छता, सुरक्षा आदी बाबत सूचना उपायुक्तांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या. तसेच मेहरुण तलावरील नियोजनाचा उपायुक्त व स्थायी सभापतींनी आढावा घेतला.
गिरणा पंपिंग व निमखेडी परिसरात बंदी
मेहरुण तलावाव्यतिरिक्त शहराला लागून असलेल्या गिरणा पंपिंग स्टेशन व निमखेडी परिसरातील बांभोरी पुलाजवळील नदीपात्रात गणपती विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. नदीपात्र धोकादायक असल्याने या ठिकाणांवर विसर्जनाला बंदी केली असून मार्ग देखील बंद करण्यात येणार आहे.