मतदानापुर्वीच पैशांचे वाटप होण्याचा संशय
; भरारी पथकांना पाचोरा, मलकापूरजवळ कारमध्ये आढळली रक्कम
जळगाव – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आर्थिक व्यवहारांवर करडी नजर ठेवली जात आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातुन तब्बल 10 लाख 15 हजार रूपयांची रोकड दोन वेगवेगळ्या कारमधुन भरारी पथकांनी जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
पाचोर्यात 5 लाख 45 हजार जप्त
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यात आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार पाचोरा विधानसभा मतदान संघात आचारसंहिता कालावधीत बेकायदेशीर कृतींना आळा घालण्यासाठी किशोर महाले यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकांच्या तपासणींतर्गत वाहनांची तपासणी करतांना वाहन क्रमांक एमएच 19 एपी 4403 वॅगनर या प्रकाराच्या वाहनातून रुपये 5 लाख 45 हजार जप्त केले आहेत. ही रक्कम जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव यांच्याकडे तात्काळ जमा करण्यात आली असल्याची माहिती जळगाव लोकसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
मलकापूरजवळ 4 लाख 70 हजार जप्त
रावेर लोकसभा मतदारसंघातील नेमण्यात आलेले स्थीर पथक प्रमुख एस.ए.उईके यांच्या पथक मलकापुर-बोदवड रस्त्यावरील मौजे जाबुळधाबा येथे वाहनतपासणी करीत होते. या वाहन तपासणी दरम्यान रात्री 9 वा. दीपक काशिनाथ धुनके रा. मोताळा यांची स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच 28 व्ही 9250ची तपासणी केली. यात 4 लाख 70 हजार रूपये रक्कम आढळुन आली. या रकमेबाबत पथकाने दीपक धुनके यांना विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. यावेळी भरारी पथकप्रमुख पी.के.पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे बोलावुन घेण्यात आले. रात्री 1.30 वा. भरारी पथकाने जप्त केलेली 4 लाख 70 हजार रूपयाची रक्कम एएसआय व्ही.एस. ठाकुर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली असुन रकमेचा पंचनामा करण्यात आला आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम आढळुन आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.