जळगाव – जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांनी आज दुपारी आपला अर्ज दाखल केला. दरम्यान, वाघ यांनी अर्ज दाखल करताना पक्षाचा ए. बी. फॉर्म जोडलेला नसल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलाच्या चर्चा अद्याप कायम आहे.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र रावेरसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनीच अर्ज दाखल केला होता. तर जळगावसाठी उमेदवारी जाहीर झालेल्या स्मिता वाघ यांनी अर्ज दाखल केला नव्हता. जळगावचे खासदार ए. टी. पाटील हे उमेदवारी कापल्याने बंडखोरीच्या तयारीत आहेत. त्यामुळे स्मिता वाघ यांनी अर्ज भरण्यापासून थांबवण्यात आल्याचे बोलले जात होते. परंतु, आज आ. स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आ. स्मिता वाघ यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आ. डॉ. गुरूमुख जगवाणी महापौर सीमा भोळे, शिवसेनेचे माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे,आरपीआईचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.
शक्तीप्रदर्शन नाही
भाजपाच्या उमेदवार आ. स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कुठलेही शक्तिप्रदर्शन केले नाही. त्यांनी सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.