जळगाव विकासाचे शनिवारी ‘टेक ऑफ’

0

जळगाव । गेल्या कित्येक वर्षापासून असलेली जळगावकरांची विमानसेवेची प्रतिक्षा शनिवारी संपणार असून उद्या शनिवारी मुंबई-जळगाव-मुंबई विमानसेवेचा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे . दुपारी एक वाजेच्या सुमारास विमानतळावर हिरवी झेंडी दाखवून पहिले विमान उड्डाण घेणार आहे. या विमानाबरोबरच जळगाव विकासात टेक ऑफ घेईल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. जळगावकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडला पाहिजे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2016 मध्ये केंद्र शासनाच्यावतीने ‘उडान’ (उडे देश का आम नागरीक- रिजनल कनेक्टीव्हिटी स्कीम) कार्यक्रम जाहीर केला आहे. केंद्र शासनाच्या या कार्यक्रमाचा लाभ राज्यातील सर्व प्रमुख शहरांना व्हावा. राज्यातील प्रमुख शहरे विमानसेवेने राज्याच्या राजधानीबरोबरच सर्व प्रमुख शहरांशी जोडली जावीत. जेणेकरुन राज्याच्या सर्व भागात विकासाला चालना मिळेल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाने जाहिर केलेल्या या योजनेला संपूर्ण देशात सर्व प्रथम महाराष्ट्र शासनाकडून प्रतिसाद देण्याचे ठरविले. आणि त्यानुसार 151 कि.मी. अंतरापासून 800 कि.मी. पर्यंतचा विमानप्रवास सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

उडाणमध्ये जळगावचा समावेश
जळगाव येथील विमानतळ गेल्या काही वर्षापासून तयार असूनही येथून विमानसेवा सुरु नव्हती. जळगाव जिल्ह्यातील व्यापार, उद्योगाच्या वाढीसाठी विमानसेवा आवश्यक असल्याची बाब जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतपाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा केला. त्यानुसार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ‘उडान’ कार्यक्रमात जळगाव चा समावेश केला.

जिल्हाधिकार्‍यांनी केली पाहणी
उद्यापासून सुरु होणार्‍या मुंबई-जळगाव-मुंबई विमानसेवेच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी विमानतळ परिसरात सुरु असलेल्या विविध कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील, तहसीलदार अमोल निकम, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे जनरल मॅनेजर सी. एस. गुप्ता, श्री. चंद्रा, डेक्कन चार्टड कंपनीचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते.

राज्यातील अन्य शहरांचा समावेश
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी जळगाव बरोबरच राज्यातील अमरावती, गोंदिया, नाशिक, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही विमानतळे ‘उडान’ कार्यक्रमातंर्गत आरसीएस विमानतळे म्हणून अधिसूचित केली आहेत. अधिसूचित केलेल्या विमानतळांवरुन टप्प्याटप्प्याने आरसीएस विमानसेवा सुरु होणार आहे. केंद्र शासनाने पहिल्या टप्प्यात 128 आरसीएस विमानमार्ग निश्‍चित केले आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर व नांदेड विमानतळांवरुन मुंबईकरिता आणि नाशिक-पुणे हे मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत. या विमानसेवांचा दर 1 हजार 420 रुपये ते 3 हजार 500 रुपये या मर्यादेत विमानप्रवासाच्या अंतरानुसार निश्‍चित करण्यात आला आहे. नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर येथून सुरु होणार्‍या आरसीएस विमानसेवा डेक्कन चार्टर्ड या विमान कंपनीने मिळविल्या आहेत.

मान्यवरांची उपस्थिती
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, महापौर ललीत कोल्हे, खासदार ए. टी. नाना पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार डॉ. अपुर्व हिरे, आमदार स्मीता वाघ, आमदार चंदुलाल पटेल, आमदार एकनाथराव खडसे, डॉ. सतीष पाटील, संजय सावकारे, हरीभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, उन्मेष पाटील, किशोर पाटील, यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.