खासदार उन्मेश पाटील यांनी घेतली प्रधान सचिवांची भेट
जळगाव : रात्रीचे विमानसेवा व खराब हवामानामुळे अनेकदा विमानसेवेत बाधा निर्माण होत होती. त्यातच गेल्या सप्ताहात विमानसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी आणि तातडीने उच्च दर्जाची विमानसेवा प्रवाशांना बहाल करता यावी यासाठी आज दिल्लीत नागरी विमान मंत्रालयाचे प्रधान सचिव प्रदीपसिंग खरोला यांची खासदार उन्मेश पाटील यांनी भेट घेतली असून रात्रीची विमानसेवा तसेच खराब हवामानात विमानसेवेसाठी सादर केलेल्या प्रस्तावास त्वरित मंजुरी देण्याची मागणी केली आहे. प्रधान सचिव प्रदीप खरोला यांनी कार्यवाही करण्याचे सूचित केले असून येत्या नऊ दिवसात उपकरणांच्या चाचणीसाठी तज्ञ समिती भेट देईल असे त्यांनी सांगितले असून लवकरच जळगाव विमानसेवा सुरळीत होणार आहे असा विश्वास खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जळगाव विमानतळावर रात्रीच्या विमानसेवेसाठी आणि मुखत्वे खराब हवामानात विमानसेवा सुरळीत चालू राहावी यासाठी सेकंड सर्किट ऑफ रनवे,ग्रेडींग ऑफ रनवे बेसिक स्ट्रीट,पापीज तसेच इतर यंत्रणेची उभारणी सुरू आहे. येत्या नऊ दिवसात केंद्राच्या तज्ञांची तपासणी आणि चाचणी समिती भेट देईल अश्या सूचना संबधित विभागाला प्रधान सचिव यांनी दिल्या आहेत. तसेच नाईट लँडींगच्या सुविधेलाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याने विमानसेवा पुर्ववत होणार आहे.