जळगाव– कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असले तरी जिल्हाधिकारी यांनी एकल दुकानांना काहीशी शिथिलता दिली आहे. मात्र नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. महात्मा गांधी रोड आणि बोहरा गल्लीत दुकानांचे शटर पाडून जवळपास 40 ते 50 जणांची गर्दी होती. दरम्यान,उपायुक्त संतोष वाहुळे यांना माहिती मिळताच त्यांनी संबंधित चारही दुकाने सीलची कारवाई केली.
कोरोनाचे रुग्ण वाढत असून जळगाव जिल्हा रेड झोन मध्ये आला आहे. लॉकडाऊन असले तरी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी मनपाची शॉपिंग कॉम्पलेक्स वगळता एकल दुकानांना शिथिलता दिली आहे. मात्र संबंधितांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे सोमवारीही काही दुकाने बंद करण्यात आली होती. गुरुवारी फुले मार्केटसह महात्मा गांधी रोड,बोहरा गल्ली या ठिकाणी कापड व्यवसायिकांनी दुकान उघडले असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांना मिळाली. त्यामुळे उपायुक्त संतोष वाहुळे, सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथक त्याठिकाणी पोहचताच व्यावसायिकांनी दुकाने बंद केलीत.
अन शटरबंद दुकानात आढळले ग्राहक
शहरातील महात्मा गांधी रोड आणि बोहरा गल्लीत उपायुक्त संतोष वाहुळे पोहचल्यानंतर काही दुकानांबाबत साशंकता आली. त्यामुळे त्यांनी दुकानांचे शटर उघडण्याची सूचना केली. शटर उघडले असता दुकानांमध्ये 40 ते 50 ग्राहक आढळून आले. त्यामुळे उपायुक्तांनी चार दुकाने सील करण्याची कारवाई केली.
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरातील काही दुकानांमध्ये उपाययोजना किंवा सोशल डिस्टन्स, फिजीकल डिस्टन्सचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी कापड व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे चार दुकाने सील करण्यात आले आहे.
-संतोष वाहुळे, उपायुक्त, मनपा