जळगाव : जून महिना लागल्यापासून प्रतीक्षा असलेल्या वरूण राजाने अखेर आज बुधवारी सायंकाळी जळगाव शहरात जोरदार हजेरी लावली. जवळपास पावून तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरवासीय सुखावले आहे. पहिल्याच पावसात जळगाव शहर अक्षरश: जलमय झाल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या पावसाने मध्यवर्ती बाजारपेठेत विक्रेत्यांसह ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान शहरात झालेल्या पहिल्याच पावसाने मनपाचे पितळ उघडे पाडले आहे. केवळ पावून तास झालेल्या पावसामुळेच शहर तुंबल्याचे दृश्य होते. शहरातील जवळपास सर्वच गटारी तुंबल्यामुळे रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे मनपाकडून केला जाणारा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. संपूर्ण शहरातील रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी तुंबले होते.
![](https://janshakti.online/new/wp-content/uploads/2019/06/DSC6427-524x348.jpg)
सकाळपासून जळगावकर उकाड्याने त्रस्त होते. त्यामुळे सगळ्याच्या नजरा पावसाकडे लागले होते. अखेर सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरवासीय सुखावले. जून महिना संपत आला आहे, मात्र अद्यापही पावसाला सुरुवात झालेले नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात ठीकठिकाणी पहिला पाऊस झाला होता मात्र जळगाव शहराकडे पावसाने पाठ फिरविली होती, अखेर बुधवारी झालेल्या पावसाने शहरवासीय काहीसे सुखावले.