जळगाव : शहरातील एका भागातील 30 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात जितेंद्र बच्छाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
महिला चक्कीवर जात असताना आरोपीने केला विनयभंग
जळगाव शहरातील एका भागातील 30 वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. शनिवार, 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास त्याच भागात राहणारा संशयीत आरोपी जितेंद्र बच्छाव (पूर्ण नाव माहीत नाही) याने विवाहिता दळण काढण्यासाठी घराबाहेर जात असताना तिचा विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या विवाहितेच्या पतीला शिवीगाळ करण्यात आली तसेच तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या, मी कोणाला घाबरत नाही, तुम्ही जास्त बोलले तर मी तुम्हाला सोडणार नाही, तुमची गाडी फोडून टाकेल, अशी धमकी दिली. या संदर्भात महिलेने पतीसह एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी जितेंद्र बच्छाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला अखेर अटक
एमआयडीसी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील आदींनी आरोपी जितेंद्र बच्छाव यास अटक केली आहे. तपास पोलिस कॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे. परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक आशीत कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली.