पुणे : पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पीएमपीएमएलच्या बसला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. बस जळण्याचे हे प्रकार तांत्रिक कारणामुळे होत आहेत की यामागे काही काळेबेरे आहे, इतकी शंका आता येऊ लागली आहे. सलग पाच बसेस मागील काही दिवसांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. सुदैवाने या जळणार्या बसेसमध्ये आत्तापर्यंत जीवितहानी झाली नसली तरी पीएमपीएमएल तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका मोठ्या जीवितहानीची वाट पाहात असल्याचे दिसते. सलग पाच बस जळूनही सत्ताधार्यांसह विरोधकही शांत असल्याने प्रवाशांची अस्वस्थता वाढली आहे. लागोपाठ घडलेल्या जळीत प्रकरणांची योग्य ती चौकशी होण्याची गरज आहे. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेची मोठी हानी होत असून, प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.
तुकाराम मुंडे चौकशीचे आदेश देणार का?
काही दिवसापूर्वी पीएमपी बसच्या अपघातांची मालिकाच सुरू झाली होती. यामध्ये अनेक निष्पाप पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांनी प्राण गमावले. हे अपघात इतके भीषण होते की दिल्लीतील ब्लू-लाईन बससेवेची अनेकांना आठवण झाली. अपघातांचे हे सत्र थांबत नाही तोच पीएमपी बस जळण्याचे सत्र सुरू झाल्याने प्रवाशांच्या उरात धडकी भरली आहे. पीएमपीचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत असल्याची भावना आज प्रवाशांच्या मनात आहे. अशाप्रकारे गंभीर अपघात घडत असतानाही पीएमपी फायद्यात आणण्यासाठी सरसावलेले आणि कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणारे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे मात्र शांत असल्याचे जाणवते. विशेष म्हणजे, दोन्ही महापालिकांमधील सत्ताधारी आणि विराधोकही काहीही बोलण्यास तयार नाहीत. या जळीतकांडाची चौकशी करण्याचे आदेश तुकाराम मुंडे यांनी देणे गरजेचे आहे. भाडेवाढीसाठी तत्परता दाखविणार्या मुंडेंना प्रवाशांच्या जीविताशी काहीच देणे-घेणे नाही का असा सवालदेखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
नादुरूस्त बसेस रस्त्यावर
पीएमपीच्या अनेक नादुरूस्त बसेस सद्यस्थितीत पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रवासी वाहतूक करत आहेत. या बसेस म्हणजे प्रवाशांसाठी साक्षात काळच आहेत. कधी अपघात घडेल हे सांगता येत नाही. त्यातच बेजबाबदारपणे बस चालविणार्या चालकांमुळेही अनेक अपघात सातत्याने घडत आहेत. आयुर्मान संपलेल्या अनेक बस बेकायदेशीरपणे रस्त्यावर चालवून पीएमपीच वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. भाडेतत्त्वावरील अनेक बस पीएमपीच्या ताफ्यात असून, त्यांची वेळच्यावेळी देखभाल, दुरूस्ती केली जात नाही. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करून पीएमपी वाहतूकीचे नियम सर्रास मोडत आहे. हजारो शाळकरी मुले अशा धोकादायक पीएमपीने प्रवास करत असल्याने या मुलांचा जीवही धोक्यात टाकला जात आहे. केवळ फायद्याचा विचार करणारे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आतापर्यंत पीएमपीच्या पाच बस जळून खाक झाल्या आहेत. परंतु, पीएमपी प्रशासन ढीम्म आहे.
एकूण 5 बसेस जळाल्या :
1) हडपसरकडून सासवडकडे जाणार्या पीएमपी बसला दिवेघाटात अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाली. बस घाट चढून जात असताना बसने अचानक पेट घेतला. प्रवाशांना तातडीने खाली उतरविल्याने पुढील अनर्थ टळला.
2) सिंहगड रोडवर पीएमपीची एक बस जळाली
3) पुणे स्टेशनवरून आकुर्डीच्या दिशेने 21 प्रवाशांना घेऊन निघालेली बस आरटीओ चौकात येताच बसच्या समोरील भागातून धूर येऊ लागला. चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना खाली उतरवले आणि काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. बसचा काही भाग आगीत जळून नष्ट झाला.
4) चिंचवडगांवातील बसस्थानकाबाहेर उभ्या असलेल्या बसने पेट घेतला होता. ही आग एवढी मोठी होती की धुराचे लोटच्या लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काहीकाळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. संत तुकारामनगर येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
5) कोथरुड डेपोत मोकळ्या जागेत पार्क केलेल्या बसला (एमएच 12 केबी 1020) आज सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन जवानांनी पाण्याचा फवारा मारुन आग विझवली. जवळच सीएनजीचे मेन स्टेशन असून वेळीच आग विझवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.