जळीतकांडाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी

0

धुळे । शहरातील आग्रारोडवरील राम शर्मा यांच्या घराला आग लागल्याने त्यांचेसह त्यांच्या कुटुंबातील सर्व पाच सदस्यांचा मृत्यू आगीत होरपळून झाला होता. यात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

गृहविभागातर्फे स्वतंत्र चौकशी करुन न्याय मिळवून द्यावा
राम शर्मा व त्यांचे कुटूंबिय यांचा पी.एम.रिपोर्ट फॉरेन्सीक लॅब कडे पाठविण्यात यावा आणि गृहविभातर्फे स्वतंत्र चौकशी करुन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अखिल भारतीय मानव अधिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जैन, नितीन शर्मा, अनिल दिक्षीत, भुषण जोशी, महेश कुळकर्णी, रमेश कुळकर्णी, बलदेव गोपाल शर्मा, शाम शर्मा, शिरीष शर्मा, आदेश कुळकर्णी, गोपाल गौड, मयुर शर्मा, दिपक खंडेलवाल, पुष्कर दिक्षित, पुष्पक जोशी, संतोष शर्मा, प्रशांत बिसावा, हेमंत शर्मा, मनोज रामेश्‍वर, संजय शर्मा, मनोज अग्रवाल, अ‍ॅड.माधवप्रसाद बाजपेयी, निलेश शर्मा, योगेश शर्मा, सोनल अग्रवाल, राजेंद्र माईनकर, सौरभ जोशी, किशोर अग्रवाल यांच्या स्वाक्षर्या आहेत.

सर्व प्रकार संशयास्पद असल्याची तक्रार
यासंदर्भात पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.26 मार्च रोजी पहाटे 2 वाजता ग.नं.2 व आग्ररोड मधील बोळीत असलेल्या शर्मा कुटूंबियांच्या घराला आग लागली होती. या आगीत राम शर्मा (42), आई शोभाबाई शर्मा (70), पत्नी जयश्री राम शर्मा (35), मुलगा साई राम शर्मा (10) आणि राधे राम शर्मा (12) यांचा करुन अंत झाला होता. मात्र, शर्मा कुटूंबियांच्याच घराला आग लागते व आजू-बाजूचे घरे लाकडी असूनही त्यांना झळही पोहचत नाही. आजू-बाजूची वस्ती दाट असून मदतीला कोणीही आले नाही. हा सर्व प्रकार संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.