जळीतग्रस्तांना हक्काची घरे देण्यासाठी प्रयत्नशील राहू – डॉ. सिद्धार्थ धेंडे 

0

पाटील इस्टेटमधील नागरिकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप

पुणे : आग दुर्घटनेच्या दिवसापासून विविध स्तरांतून येथील नागरिकांना मदत केली जात आहे. परंतु, त्यांना पक्की घरे मिळायला हवीत. त्यासाठी पाठपुरावा करीत असून, लवकरच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सर्वांना हक्काची घरे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त दि मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या संयुक्त विद्यमाने पाटील इस्टेट आगीतील पीडित कुटुंबीयांना 10 लाखांच्या गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये पिंप, हंडा-कळशी, पातेले, परात, चमचे या साहित्याचा समावेश होता. एकूण 300 कुटुंबाना हे साहित्य वाटण्यात आले.

सामाजिक जाणिवेतून कार्य

वाकडेवाडीतील मांगीरबाबा देवस्थान ट्रस्टमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला दि मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अ‍ॅड. अयुबभाई शेख, सोनाली लांडगे, महेश शिंदे आदी उपस्थित होते. सामाजिक जाणिव आणि कर्तव्य भावनेतून बँकेतर्फे हे कार्य होत आहे. गरिबीच्या चक्रातून बाहेर पाडण्यासाठी झोपडपट्टीतल्या मुलांनीही शिकले पाहिजे. व्यसनांपासून दार राहिले पाहिजे. स्वतःची प्रगती साधायची असेल, तर शिक्षणावाचून दुसरा तरणोपाय नाही, हे आपण लक्षात घ्यावे, असे डॉ. पी. ए. इनामदार यांनी यावेळी सांगितले.