आठ दिवसात घरे बांधण्याचे आश्वासन केले पुर्ण
चिंचवड : मी साहेब नाही… मी तर तुमचाच सेवक आहे. तुमच्याच आशीर्वादाने आज नगरसेवक आहे. तुमची सेवा करणे हाच धर्म निभावत आहे, असे म्हणत नगरसेवक शैलेश मोरे यांनी गुरुवारी दळवीनगरातील जळीत घरांची वीट उभारणी केली. गेल्या आठवड्यात गुरुवारी पहाटे पिंपरी-चिंचवड शहरातील दळवीनगर येथे अचानक लागलेल्या आगीत सहा घरे जळून खाक झाले होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर या कुटुंबांच्या घरांची राख होवून ही कुटुंबे बेघर झाले होते. घटनेनंतर स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली होती. तसेच, पिडीत कुटुंबांना आठ दिवसांच्या आत घरे बांधून देण्याचे आश्वासन यावेळी नगरसेवक मोरे यांनी दिले होते. गरिबांची भावना जाणून दिवाळी पूर्वी या बेघर कुटुंबांना घरे बांधून देण्याचा ‘पण’ पूर्ण करत शुक्रवारी जळीत घरांच्या वीट उभारणीला सुरुवात झाली. यावेळी जेष्ठ नागरिक अरुण सोनार, अमोल मांगले, दिनेश क्षीरसागर, कोरे यांच्यासह नुकसानग्रस्त यशोदा क्षीरसागर, राजाबाई म्हसा जाधव, सुमन हरि मनोहर, श्यामला राऊत, सुनंदा वाघमारे, मंगला मुसळे आदी उपस्थित होते.
नगरसेवक मोरे यांनी केला शब्द पुर्ण
गेल्या आठवड्यात दळवीनगरात गुरुवारी पहाटे अचानक लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान होऊन ही सहा कुटुंबे उघड्यावर पडली. तर दोनजणांना या घटनेत जीव गमवावा लागला. शुक्रवारी दुपारी स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नुकसानग्रस्तांची भेट घेवून स्वखर्चाने घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. गुरुवारी मोरे यांच्या हस्ते घरे उभारणीला प्रारंभ झाला. दिवाळी सणाच्या अगोदरच या सहा घरांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी कुठलाही अडथळा येणार नसून काम पूर्ण होईपर्यंत लागेल ती मदत देणार असल्याचे मोरे यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे, गेल्या आठ दिवसांपासून पिडीतांना अन्नधान्य पुरवठा केला जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. हृदयाचे ठोके थांबविणार्या या घटनेने परिसरात एकच खळबड माजली होती. पिडीतांनी मोरे यांना घेराव घालून मदतीची आस धरली होती. यावेळी, आगीत खाक झालेल्या सहा घरांची नव्याने बांधकामाची जबाबदारी घेत असल्याचे मोरे यांनी जाहीर केले होते. यासाठी लागणारे खडी, विटा, रेती, सिमेंट, आसारी तसेच बांधकामाचे साहित्य घटनास्थळी उपलब्ध करण्यात आल्याचेही मोरे यांनी यावेळी सांगितले.