जळगाव । चोपडा येथील जळीत विवाहितेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान सासरच्या मंडळींनी रॉकेल टाकून जाळून मारल्याचा आरोप विवाहितेच्या कुटुंबियांनी करून पतीसह सासरच्या मंडळींविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबाबत विवाहितेच्या भावाने दिलेली माहिती अशी की,नफीसाबी खलिल शेख वय 35 या विवाहितेचे भुसावळ येथील माहेर असून चोपडा येथील मणियार अळी येथे सासर आहे.
जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी
नफीसाबी यांचा गेल्या पाच वर्षापासून सासरच्या मंडळींकडून शारिरीक व मानसिक छळ सुरु होता. या पूर्वी सासरच्या मंडळींनी तिला एकदा जाळून मारल्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान काल दि.10 रोजी रात्री पती खलिल शेख भिकारी, सासु सबनुसबी भिकारी शेख व दिर अमिन भिकारी शेख या तिघांनी नफीसाबी यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळले. त्यानंतर त्यांना तात्काळ रात्रीच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. विवाहिता 94 टक्के जळाल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान विवाहितेचा आज सकाळी 10.15 वाजता मृत्यू झाला. दरम्यान पती, सासु व दिर या तिघांनी विवाहितेला जाळून मारल्याचा आरोप करून त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाऊ शेख रफीक शेख उस्मान याने केली आहे. याप्रकरणी डॉ. प्रविण पाटील यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.प्राथमिक तपास पोहेकॉ. मनोज पवार व नापोकॉ. फिरोज तडवी करीत आहे.