अमळनेर- तालुक्यातील जवखेडा येथील एका 25 वर्षीय तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 8 रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली होती. धुळे सामान्य रुग्णालयात या तरुणावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मंगेश शांताराम पाटील उर्फ भैय्या (25) असे मृत तरुणाचे नाव आहे. भैय्या पाटील याने रविवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास स्वतः जवळ असलेली चारचाकी (एम.एच 04 व्ही.डी. 2282) जवखेडा गावाबाहेरील कैलास शिखर टेकडीवरील मंदिराजवळ लावत स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मंदिरावरील सजनपुरी महाराजांनी ही घटना गावातील पोलीस पाटील उल्हास लांडगे यांना कळवल्यानंतर जळीत अवस्थेतील मंगेश यास धुळे सामान्य रुग्णालयात हलवले होते. रात्री उशिरा उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हा तरुण नाशिक येथे वाहन चालक असल्याची माहिती असून तो सुटीवर आल्याचे सांगण्यात आले. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.