जवळेत चाकूचा धाक दाखवून महिलेला लुटले

0

चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह 1 लाखाचा ऐवज लांबविला

निरगुडसर : जवळे ता. आंबेगाव (वाळुंजमळा) चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रासह 35 हजार रोख रक्कम असा 1 लाख रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. गुरुवारी दि. 25 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मधुकर सोपान बोर्‍हाटे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

घरावर पाळत ठेवत केली चोरी…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाळूंजमळा येथे राहतात. त्यांच्या पत्नी सुंदराबाई मधुकर बोर्‍हाटे यांना काल सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान दोन अज्ञात युवकांनी गाडीवर लिफ्ट देत घरी सोडले होते. घरी आल्यावर या युवकांना घरात बोलवत सुंदराबाई यांनी त्यांना चहा दिला. या युवकांनी पाळत ठेवत घराची कडी उचकटून आत प्रवेश केला. तसेच, चाकुचा धाक दाखवून सुंदराबाई बोर्‍हाटे यांच्या गळ्यातील, एक लहान, एक मोठे मंगळसूत्र तसेच कपाटातील 35 हजार रुपये रोख रक्कम असे एकूण 1 लाख रुपयांचा ऐवज लांबविला.

पहाटेच मिळाली घटनेची माहिती…
जवळे व परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस पाटील उत्तम शिंदे, ग्रामसुरक्षा दलातील, निरंजन शिंदे, अभिजित शिंदे, पंढरी टाव्हरे, दिनकर शिंदे, अनिल शिंदे, सागर शिंदे हे गस्तीवर होते. पहाटे घरी येत असताना वाळुंजमळा येथे चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती कळताच मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक अर्जुन शिंदे, बीट अंमलदार सागर गायकवाड, जवळे पोलीस पाटील उत्तम शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली. याबाबत मधुकर बोर्‍हाटे, सुंदराबाई बोर्‍हाटे यांनी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.