जवानांचे ‘डीएनए प्रोफायलिंग’

0

पुणे । एनएसजी जवान, स्पेशल फोर्स कमांडो, वैमानिक, पाणबुडी आणि जहाजावरील सैनिक यांना कायम धोका असतो. बॉम्ब हल्ला, आग तसेच विमान अपघात अशा घटनांनंतर सैनिकांच्या मृतदेहांची ओळख पटविणे अवघड होऊन बसते. यासाठी हाय रिस्क झोनमधील जवनांचे डीएनए प्रोफायलिंग करण्याचे काम सुरू असून जवळपास 7 हजार जवानांचे डीएनए सॅम्पलिंग जमा करण्यात आले आहे. सर्व जवानांचे डीएनए जमा करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे जवानांची ओखळ पटवणे भविष्यात शक्य होणार आहे, अशी माहिती आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेचचे डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली. पुण्यातील आर्म फोर्स मेडिकल महाविद्यालयात 66 व्या अ‍ॅन्यूअल आर्म फोर्स मेडिकल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लष्करी आरोग्याविषयात अतिउच्च दर्जाच्या संशोधनात वाढ करण्याविषयी तज्ज्ञांची बैठक होणार आहे. याबाबत पत्रकारांना माहिती देताना लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी बोलत होते.

पुरी म्हणाले, नमुने गोळा करण्यासाठी 170 डॉक्टरांची टीम प्रशिक्षीत केली असून पुण्यातील एएफएमसीमध्ये ते गोळा करण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी झालेल्या सुखोईच्या अपघातात वैमानिकांची ओखळ पटवणे कठीण झाले होते. यावेळी त्यांच्या शरीराच्या काही अवयावरून डीएनएच्या माध्यमातून त्यांची ओळख पटविण्यात आली होती. यामुळे संपूर्ण जवानांचे डीएनए नमुने घेण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. आर्म फोर्स मेडिकल कॉलेजद्वारे ते करण्यात येत आहे. आर्म फोर्स मेडिकल महाविद्यालयाच्या कोर्सची क्षमता वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. येत्या सत्रापासून 150 मुला-मुलींना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. याबरोबरच पायाभूत सुविधा देण्यावर भर असणार आहे. आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये येत्या काळात रिसर्च विंगची स्थापना करण्यात येणार आहे. यात लष्कराच्या मेडिकल कॉलेजमधून संशोधकांची फळी निर्माण करण्यात येणार आहे.

कमांड हॉस्पिटलचे रखडलेले काम लवकर होणार पूर्ण
पुण्यातील सर्वात मोठे असणारे कमांड हॉस्पीटलचे रखडलेले काम लवकरच पूर्ण होणार आहे. 1082 बेडची सुविधा असलेल्या या दवाखाण्याच्या कामाला 2013 मध्ये मंजुरी मिळाली होती. हे काम 2016 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. दवाखान्याच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, आतील काही कामे कंत्राटदाराने पूर्ण केली नाहीत. कामाला उशीर होत असल्यामुळे सध्या असलेल्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात नव्याने निविदा काढण्यात येणार असून राहिलेले काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

पुण्यात रोबोटद्वारे सर्जरी
शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेत अनेक बदल होत आहे. रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रीया करण्यात येत आहे. येत्या काळात पुण्यातील एएफएमसी, तसेच मुंबई आणि बंगळुरू येथील लष्कराच्या रूग्णालयात रोबोटद्वारे शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे उपकरणे तसेच विभागाची निर्मिती करण्यात येणार आहे. युद्धभूमीत जखमी जवानांना सुरक्षित बाहेर काढणे मोठी जबाबदारी असते. जवानांना आपला जीव धोक्यात घालून जखमींना बाहेर काढावे लागते. भविष्यात जखमींना युद्धभूमितून बाहेर काढण्यासाठी रोबोटची मदत घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने डीआरडीओमध्ये असे रोबोट बनविण्याचे संशोधन सुरू असल्याची माहिती लेफ्टनंट जलरल पुरी यांनी दिली.