नवी दिल्ली। दगडफेक करणार्यांपासून वाचण्यासाठी लष्कराच्या जीपवर काश्मिरी युवकाला बांधून त्याची मानवी ढाल करण्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी समर्थन केले आहे. सैनिकांना काश्मीरमधील डर्टी वॉरशी निपटण्यासाठी नवनव्या पद्धती शोधण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. जेव्हा लोक दगड आणि पेट्रोलबॉम्ब फेकत असतील तेव्हा मी आमच्या लोकांना हे सर्व पाहत राहून त्यांना मरण्यासाठी सोडू शकत नाही, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्टपणे ठणकावले. जर आंदोलकांनी दगड फेकण्याऐवजी गोळीबार केला असता तर मी खूप आनंदी झालो असतो, असे वक्तव्यही त्यांनी केले. काश्मीर मुद्द्यावर ठोस उपायाची गरज असून, यामध्ये प्रत्येकाला सहभागी करून घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.
मेजर गोगाईचे केले होते समर्थन
जीपवर स्थानिक व्यक्तिला बांधणार्या मेजर लितूल गोगाई यांना सन्मानित करण्यात आले होते. यावर फुटीरवादी नेते आणि काही राजकीय पक्षांनी टीका केली होती. तर दुसरीकडे केंद्र सरकारने या मुद्द्यावर लष्कराला साथ दिली आहे. गोगाई यांनीही माध्यमांसमोर येत संपूर्ण घटनेची माहिती दिली होती. त्याचबरोबर स्थानिक लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले होते. हिंसक झालेल्या जमावावर जर आपण गोळीबार केला असता तर किमान 12 लोकांचा जीव गेला असता, असा खुलासा गोगाई यांनी केला होता. गोगाई यांच्या सन्मानाचा या घटनेशी काहीही संबंध नाही. पण यावरून राजकारण केले जात असल्याचे लष्कराने म्हटले होते.
लष्कर-काश्मिरी युवकांत संघर्ष वाढला
दरम्यान, गेल्या महिन्यात सोशल मीडियावर स्थानिक काश्मिरींनी निवडणुकीच्या कामासाठी कर्तव्यावर असलेल्या केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लगेच आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये लष्कराची एक तुकडी एका काश्मीरी युवकाला जीपला बांधून घेऊन जात असल्याचे दाखवण्यात आले होते. जीपला बांधलेल्या युवकाच्या छातीवर एक कागद चिटकवण्यात आला होता आणि त्यावर, मी एक दगडफेक करणारा आहे, असे लिहिले होते. त्याचबरोबर लाऊडस्पीकरवरून प्रत्येक दगडफेक करणार्यांची हीच अवस्था होईल, असे सांगण्यात येत होते. हा व्हिडिओ श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीच्या दरम्यान 9 एप्रिल रोजी तयार करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही हा व्हिडिओ ट्विट करून याप्रकरणी कठोर निर्णय घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, काश्मीर खोर्यात भारतीय लष्कर व स्थानिक युवक यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे.