श्रीनगर – काश्मीरमधील पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरून परत असणार्या केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफच्या जवानांना येथील फुटीरतावाद्यांच्या टोळक्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयातून व्हायरल झाला, त्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर सरक्षा यंत्रणेने या प्रकरणाचा छडा लावल्यानंतर हा संतापजनक प्रकार करणार्या फुटीरतावाद्यांंची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
शस्त्रास्त्रधारी जवानांना मारहाण करणारे फुटीरतावादी तरुण हे बडगाम जिल्ह्यातील क्रालपोरा परिसरातील राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआरपीएफचे महासंचालकही श्रीनगरला रवाना झाले आहेत.
9 एप्रिल रोजी काश्मीरमध्ये अनंतनाग या लोकसभेच्या मतदारसंघाची पोटनिवडणूक होती, या पोटनिवडणुकीच्या बंदोबस्ताची जबाबदार पार पाडल्यानंतर सीआरपीएफचे जवान परतत होते. तेव्हा पुलवामा या ठिकाणी त्यांना फुटीरतावाद्यांच्या टोळक्याने अडवून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फुटीरतावाद्यांनी अक्षरशः जवानांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यासंबंधीचा व्हिडीओ जेव्हा सोशल मिडियामध्ये व्हायरल झाला, तेव्हा देशभर संतापाची लाट उसळली. या व्हिडीओमध्ये पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरुन परतणार्या सीआरपीएफ जवानांना काही टवाळखोर फुटीरतावाद्यांनी यावेळी चक्क लाथा-बुक्क्यांनी मारले. विशेष म्हणजे फुटीरतावादी तरुण मारहाण करत असताना, हातात एके-47 ही गन हातात असूनही जवान शांत होते. त्यांनी कुठल्याही प्रकारचे प्रत्युत्तर दिले नाही.
कायद्याचे पालन करत जवानांनी सहन केली मारहाण
कोणत्याही आदेशाशिवाय सैन्यांना नागरिकांवर कारवाई करता येत नाही, हे सैन्यांसाठी बंधनकारक असते. नेमके याच कारणामुळे त्या जवानांनी फुटीरतावाद्यांची मारहाण निमूटपणे सहन केली. त्या जवानांच्या हातामध्ये एके 47 सारखी आधुनिक मशिन गन होती, तरीही त्या जवानांनी फुटीरतावाद्यांना प्रत्युत्तर दिले नाही. विशेष म्हणजे शस्त्रास्त्रधारी जवान असतांनाही फुटीरतावादी त्या जवानांना बिनदिक्कतपणे मारहाण करत होते. यावरून त्या फुटीरतावाद्यांना जवान किती कायद्याचे पालनकर्ते आहेत, यावर विश्वास होता. त्याचा गैरफायदा घेत फुटीरतावाद्यांची जवानांचे असे भररस्त्यावरून धिंडवडे काडले.